World Para Athletics Championships 2025
World Para Athletics Championships 2025: भारताने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या क्रीडा इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्ली येथे 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 22 पदके जिंकत नवा विक्रम केला आहे.
भारतीय संघाने 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्यपदकं जिंकून एकूण पदक तालिकेत 10 वे स्थान मिळवले. ही कामगिरी भारताला पॅरा-अॅथलेटिक्सच्या जागतिक नकाशावर आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवून देते.
भारताची ऐतिहासीक कामगिरी -
2025 च्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी असामान्य कामगिरी करत जगभरात लक्ष वेधले. भालाफेकपटू सुमित अंतिलने 71.37 मीटर फेकसह F64 श्रेणीतील नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याचबरोबर सिमरन शर्माने महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत सुवर्णपदक आणि 200 मीटर T12 मध्ये रौप्यपदक मिळवत आशियाई विक्रम नोंदवला. इतर सुवर्णपदक विजेत्यांमध्ये निषाद कुमार (T47 उंच उडी), संदीप संजय सरगर (F41 भालाफेक), रिंकू हुडा, आणि शैलेश कुमार (T42 उंच उडी) यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या खेळातून केवळ पदकेच जिंकली नाहीत, तर देशातील दिव्यांग खेळाडूंना प्रेरणा दिली.
हेही वाचा - Ind v Pak Women World Cup 2025 : महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची हार! भारताने 88 धावांनी मिळवला विजय
या ऐतिहासिक यशामागे Target Olympic Podium Scheme (TOPS) आणि Khelo India सारख्या शासकीय योजनांचा मोठा वाटा आहे. या योजनांमुळे खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळाली. भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, या खेळाडूंनी केवळ पदकेच जिंकली नाहीत, तर देशाच्या मानसिकतेतही बदल घडवून आणला आहे.
हेही वाचा - Rohit Sharma Captaincy Controversy | 'या' तीन कारणांमुळे रोहित शर्माला गमवावं लागलं कर्णधारपद
दरम्यान, 2025 मध्ये भारताने पहिल्यांदाच जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात जागतिक दर्जाचे मोंडो ट्रॅक आणि सुधारित accessibility features वापरण्यात आले. मायदेशाच्या मैदानावर खेळल्याने भारतीय खेळाडूंना मोठा मानसिक आधार मिळाला. तथापी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी भारताच्या आयोजन कौशल्याचे कौतुक केले आणि याला जागतिक पॅरा-स्पोर्ट्स क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा म्हटले आहे.
भारताने 2015 मध्ये केवळ 2 पदके जिंकली होती, तर 2025 मध्ये हा आकडा 22 पदकांपर्यंत पोहोचला आहे. ही प्रगती वाढती जागरूकता, तळागाळातील प्रशिक्षण, आधुनिक क्रीडा विज्ञान आणि दिव्यांग खेळाडूंच्या सामाजिक स्वीकृतीमुळे शक्य झाली आहे. द लॉजिकल इंडियनच्या मते हे यश केवळ पदकांचा हिशोब नाही. तर ही मानवी लवचिकता आणि समावेशाची कथा आहे. भारतीय पॅरा-अॅथलीट्सनी सिद्ध केले आहे की दृढ निश्चय आणि योग्य संधी मिळाल्यास कोणतेही बंधन अशक्य नाही. त्यांचे हे यश समाजातील दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रेरक ठरत आहे.