Montenegro Boxing Championships: एकीकडे भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जेतेपदासाठी सज्ज झाला असताना, दुसरीकडे भारतीय बॉक्सिंग क्षेत्रासाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारतीय ज्युनियर बॉक्सिंग संघाला एका प्रशासकीय आणि लॉजिस्टिक अडथळ्यामुळे जागतिक विश्वचषक स्पर्धेतून न खेळताच बाहेर पडावे लागले आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे खेळाडूंचे पासपोर्ट वेळेवर भारतात पोहोचू शकले नाहीत, परिणामी भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले आहे.
नेमकी अडचण काय झाली?
भारतीय ज्युनियर बॉक्सिंग संघ 3 ते 11 मार्च 2026 दरम्यान मॉन्टेनेग्रो येथील बुडवा येथे होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार होता. मॉन्टेनेग्रोचा स्वतःचा दूतावास भारतात नसल्यामुळे, भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला (BFI) व्हिसा स्टॅम्पिंगसाठी खेळाडूंचे मूळ पासपोर्ट संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील मॉन्टेनेग्रो दूतावासात पाठवावे लागले. 20 फेब्रुवारी रोजी हे पासपोर्ट पाठवण्यात आले होते, मात्र तिथे अचानक युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने कुरिअर सेवा आणि कार्यालयीन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले.
युद्धाचा थेट फटका आणि पासपोर्टचा पेच
नियमानुसार व्हिसा स्टॅम्पिंग होऊन पासपोर्ट 2 ते 3 दिवसांत परत येणे अपेक्षित होते. मात्र, इराण आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक सेवा विस्कळीत झाली. भारतीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि मॉन्टेनेग्रो दूतावास यांच्याशी फेडरेशनचे अधिकारी सतत संपर्कात होते. ईमेलवर व्हिसाची पुष्टी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष पासपोर्ट हातात नसल्यामुळे खेळाडू मॉन्टेनेग्रोला रवाना होऊ शकले नाहीत.
विमान तिकिटे रद्द आणि भारताची माघार
10 सदस्यीय या ज्युनियर संघासाठी विमान तिकिटे स्टँडबायवर ठेवण्यात आली होती. शेवटच्या क्षणापर्यंत पासपोर्ट मिळतील अशी आशा होती, पण पासपोर्ट वेळेत न पोहोचल्याने संघ निर्धारित वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. अखेर, जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी या तरुण बॉक्सर्सना गमवावी लागली असून भारताला या स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घ्यावी लागली आहे.