Monday, May 11, 2026 01:14:17 PM

Players Injury Update: स्टार खेळाडूंच्या दुखापतींनी वाढले फ्रँचायझींचे टेन्शन; जाणून घ्या रोहित-विराटसह 5 बड्या खेळाडूंचे फिटनेस अपडेट

सॅम करन आणि हर्षित राणा यांसारखे खेळाडू आधीच स्पर्धेबाहेर गेले असताना, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या स्टार खेळाडूंना झालेल्या दुखापतींनी चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे.

players injury update स्टार खेळाडूंच्या दुखापतींनी वाढले फ्रँचायझींचे टेन्शन जाणून घ्या रोहित-विराटसह 5 बड्या खेळाडूंचे फिटनेस अपडेट

Players Injury Update: IPL 2026 चा थरार रंगात आलेला असतानाच, दिग्गज खेळाडूंच्या दुखापतींनी संघांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सॅम करन आणि हर्षित राणा यांसारखे खेळाडू आधीच स्पर्धेबाहेर गेले असताना, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या स्टार खेळाडूंना झालेल्या दुखापतींनी चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. काही खेळाडू केवळ सुरुवातीचे सामने मुकले आहेत, तर काहींना स्पर्धेच्या मध्यात दुखापतींनी ग्रासले आहे. हे खेळाडू मैदानात कधी परतणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रोहित-विराटच्या दुखापतीची स्थिती
मुंबई इंडियन्सचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याला RCB विरुद्धच्या सामन्यात 'हॅमस्ट्रिंग'ची दुखापत झाली. त्याच्या दुखापतीची तीव्रता तपासण्यासाठी स्कॅन करण्यात येणार असून, तो पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, RCB चा स्टार फलंदाज विराट कोहली याला घोट्याचा त्रास जाणवल्याने त्याने क्षेत्ररक्षण केले नव्हते. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट पट्टी बांधून सराव करताना दिसल्याने, तो पुढील सामना खेळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

धोनी आणि कमिन्सच्या पुनरागमनाचे संकेत
चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीतून (Calf Strain) सावरलेला MS धोनी आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. तो 18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, SRH चा कर्णधार पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियात फिटनेस टेस्ट देऊन परतणार असून, तो तंदुरुस्त आढळल्यास 18 एप्रिलला चेन्नईविरुद्ध खेळताना दिसेल.

हेही वाचा - CSK Vs KKR IPL 2026: चेपॉकवर चेन्नईचा 'सुपर' धमाका!; CSK ने KKR ला 32 धावांनी लोळवलं, कोलकात्याचा सलग चौथा पराभव

मिचेल स्टार्कची प्रतीक्षा संपणार
दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात महागडा गोलंदाज मिचेल स्टार्क खांदा आणि कोपराच्या दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. ताज्या अहवालांनुसार, स्टार्क 20 एप्रिलनंतर निवडीसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्याच्या पुनरागमनामुळे दिल्लीच्या गोलंदाजीला मोठी धार येणार आहे. ऐन स्पर्धेच्या मध्यभागी प्रमुख खेळाडूंच्या या दुखापतींनी IPL मधील गुणतालिकेची गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 


सम्बन्धित सामग्री