Sai Sudarshan : क्वालिफायर 1 मधून क्वालिफायर 2 मध्ये आपली पूर्ण ताकद लावणारा गुजरात टायटन्स हा संघ आता रविवार 31 मे रोजी आरसीबी समोबत फायनलच्या सामन्यात भिडणार आहे. या सामन्यातून आयपीएलचा यंदाचा विजेता संघ मिळणार आहे. आयपीएल 2026 च्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर-2 म्हणजेच सेमी फायनल सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर पार पडला. यावेळी राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावांचे विशाल आव्हान गुजरात समोर उभे केले होते. हे आव्हान पूर्ण करत गुजरात टायटन्सने दमदार फलंदाजीच्या जोरावर 18.4 षटकांत 3 गडी गमावून यशस्वीरित्या विजय गाठला आहे.
दरम्यान साई सुदर्शन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने 167 धावांची मोठी भागीदारी करून गुजरातला मजबूत पाया रचून दिला. यावेळी साई सुदर्शन 32 चेंडूंत 58 धावा करून 'हिट विकेट' बाद झाला. यापूर्वी देखील धर्मशाळा येथे खेळल्या गेलेल्या क्वालिफायर 1 मध्ये साई सुदर्शन हिट विकेटवर बाद झाला. त्यामुळे आता 31 मे रोजी होणाऱ्या फायनलच्या सामन्यात साई सुदर्शनकडून ही चूक होणं संघाला भारी पडू शकतं.
ज्याप्रमाणे साई सुदर्शन धर्मशाळा येथे आरसीबीविरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये हिट विकेटवर बाद झाला होता, त्याचप्रमाणे तो न्यू चंदीगडच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर 2 मध्येही हिट विकेटवर बाद झाला.
दोन्ही वेळेस, त्याची बॅट त्याच्या हातातून निसटली आणि हवेत फिरली ज्यामुळे ती बॅट स्टम्प वर आदळली आणि साई सुदर्शन बाद झाला. साई सुदर्शन हा गुजरात टायटन्स संघासह आयपीएलमधील खेळाडूंमध्ये यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र जर त्याने अंतिम सामन्यातही हीच चूक केली तर ही या हंगामातील त्याची हॅट-ट्रिक असेल. दरम्यान अंतिम सामन्यात त्याची ही एक चूक आरसीबीविरुद्ध खेळताना गुजरातला अडचण ठरू शकते. या सामन्याची उत्सूकता सर्व क्रिकेट चाहत्यांना लागली असून यावेळी कोण बाजी मारणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.