हैदराबाद: आयपीएल 2026 च्या हंगामात पंजाब किंग्सच्या चिंतेत आता मोठी भर पडली आहे. बुधवारी (6 मे 2026) रोजी झालेल्या अटीतटीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने पंजाबचा 33 धावांनी पराभव केला. हा पंजाबचा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांनी सोडलेले सोपे झेल पंजाबच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.
“आता हे अति होतंय!” श्रेयस अय्यरची कडक शब्दांत नाराजी
सलग तिसऱ्या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या बांध अखेर तुटला. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “हे आता थोडं जास्तच झालं आहे. आम्ही सुरुवातीच्या षटकांमध्येच सोपे झेल सोडले, ज्याचा फटका आम्हाला बसला. सनरायझर्सच्या खेळाडूंनी खरोखरच दर्जेदार क्रिकेट खेळलं आणि सामना कसा जिंकायचा असतो हे दाखवून दिलं. आमच्या स्पर्धेची सुरुवात एखाद्या स्वप्नासारखी झाली होती, पण जर आपण अशा चुका करत राहिलो, तर त्या खेळाचा संघाला काहीच फायदा होणार नाही.”
पंजाबची अवस्था बिकट असताना कूपर कोनोलीने एकट्याने सामना लढवला. त्याने 59 चेंडूत नाबाद 107 धावांची आक्रमक खेळी केली. कोनोलीच्या या शतकामुळेच पंजाबला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली, अन्यथा पराभवाचे अंतर 100 धावांच्या पुढे गेले असते. कोनोलीचे कौतुक करताना अय्यर म्हणाला, “कोनोली हा कमाल खेळाडू आहे. त्याची विचार करण्याची पद्धत आणि दबावाच्या परिस्थितीत मोठ्या धावा करण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.”
युजवेंद्र चहलची झुंज अन् नशिबाची साथ
कर्णधाराने अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीचीही प्रशंसा केली. “चहलने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती पूर्णपणे निर्भीड होती. मी त्याला आक्रमक राहून विकेट घेण्याचे निर्देश दिले होते. त्याने अनेकदा विकेट घेण्याच्या संधी निर्माण केल्या, पण आमचं नशीबच खराब होतं, कारण क्षेत्ररक्षक कॅच पकडू शकले नाहीत,” असे अय्यरने खेदाने नमूद केले.
Cooper tried his very best but we fell short in Hyderabad. pic.twitter.com/tIG4Mk1Kgd — Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 6, 2026
मैदानावर सुटले एक-दोन नाही तर तब्बल 4 कॅच
हैदराबादच्या डावा दरम्यान पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी तब्बल 4 वेळा जीवनदान दिले. आठव्या षटकात स्वतः कूपर कोनोलीने ईशान किशनचा सोपा झेल सोडला. त्यानंतरच्या षटकात चहलच्या चेंडूवर शशांक सिंहने हेनरिक क्लासेनला जीवदान दिले. 11 व्या षटकात ईशान किशनला पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली, जेव्हा लॉकी फर्ग्युसनने त्याचा झेल सोडला. एवढेच नाही तर यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंहनेही ईशान किशनला यष्टीचित (stumping) करण्याची सोपी संधी गमावली.
पंजाबसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न
एकेकाळी गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्सची गाडी आता रुळावरून घसरली आहे. सलग तीन पराभवांमुळे प्लेऑफची समीकरणे कठीण होण्याची चिन्हे आहेत. संघाला जर पुनरागमन करायचे असेल, तर केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही मोठी सुधारणा करावी लागणार आहे. आता आगामी सामन्यात पंजाब आपल्या या चुकांमधून धडा घेऊन मैदानावर कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.