IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाते. मात्र, या लीगबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी सध्याच्या फॉरमॅटवर प्रश्न उपस्थित करत मोठा आर्थिक तोटा होत असल्याचा आरोप केला आहे.
ललित मोदी यांच्या मते, सध्याच्या स्पर्धेत अपेक्षित तितके सामने खेळवले जात नसल्यामुळे बीसीसीआयला मोठ्या प्रमाणावर महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आयपीएलमध्ये प्रत्येक संघाने इतर सर्व संघांविरुद्ध घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर सामने खेळणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात असे होत नसल्यामुळे अनेक सामने कमी होत आहेत.
आयपीएलमध्ये सध्या 10 संघ सहभागी आहेत. या संघांमध्ये पूर्ण ‘होम अँड अवे’ फॉरमॅटनुसार सामने खेळवले गेले असते, तर लीग टप्प्यातील सामन्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असती. त्यानंतर प्लेऑफचे सामने धरून एकूण सुमारे 94 सामने होऊ शकले असते. परंतु सध्या फक्त 74 सामने खेळवले जात आहेत. यामुळे जवळपास 20 सामन्यांचा तोटा होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
https://t.co/wpA2xvRgBd pic.twitter.com/MUbWuRWqf6 — Lalit Kumar Modi (@LalitKModi) April 7, 2026
या अतिरिक्त सामन्यांमुळे मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिपमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकले असते. मोदी यांच्या गणितानुसार, प्रत्येक सामन्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर सुमारे 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकला असता. हा पैसा केवळ बीसीसीआयसाठीच नव्हे, तर सर्व फ्रँचायझींसाठीही फायद्याचा ठरला असता.
याशिवाय, या उत्पन्नातील काही हिस्सा संघांना मिळाला असता, ज्यामुळे प्रत्येक टीमची आर्थिक ताकद वाढली असती. त्यामुळे खेळाडूंची गुणवत्ता, सुविधांमध्ये सुधारणा आणि स्पर्धेची पातळी अधिक उंचावली गेली असती, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
? LALIT MODI EXPOSES BCCI’S ₹2,400 CRORE LOSS EVERY YEAR ? Lalit said – “IPL is missing out on ₹2,400 crore every single year; We are losing huge money because the league is not growing worldwide. This is a total disaster for the future of IPL!” ?pic.twitter.com/fzrjYkGscS — Sam (@Cricsam01) April 7, 2026
ललित मोदी यांनी बीसीसीआयच्या सध्याच्या नियोजनावरही टीका केली आहे. त्यांच्या मते, जर वेळापत्रकात जागा नसेल तर संघांची संख्या वाढवण्याचा निर्णय चुकीचा ठरतो. स्पर्धेची खरी मजा आणि आर्थिक मूल्य ‘होम अँड अवे’ या पद्धतीतच दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
या वक्तव्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये खरंच एवढा तोटा होत आहे का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआयकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.