Kavya Maran Buys Pakistani Player: इंग्लंडमधील प्रसिद्ध ‘द हंड्रेड’ (The Hundred) लीगच्या लिलावात यंदा मोठी खळबळ उडाली आहे. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या मालकी असलेल्या ‘सनरायझर्स लीड्स’ या संघाने पाकिस्तानच्या एका खेळाडूला मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील केले आहे. सनरायझर्सच्या मालक काव्या मारन यांच्या या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलशी संबंधित मालक खरेदी करणार नाहीत, या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
अबरार अहमदवर सनरायझर्स लीड्सने लावली मोठी बोली
पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अबरार अहमद याला खरेदी करण्यासाठी लिलावात जोरदार चुरस पाहायला मिळाली. ट्रेंट रॉकेट्स आणि सनरायझर्स लीड्स यांच्यात अबरारला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ लागली होती. अखेर सनरायझर्स लीड्सने बाजी मारत अबरार अहमदला अंदाजे 2.34 कोटी रुपयांना विकत घेतले. अबरारच्या समावेशामुळे संघाची फिरकी बाजू भक्कम झाली असून, हा करार या लिलावातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.
पाकिस्तानी खेळाडूंबाबतचे ‘ते’ दावे ठरले फोल
लिलावापूर्वी इंग्रजी माध्यमांनी, विशेषतः बीबीसीने असा दावा केला होता की, ‘द हंड्रेड’मधील आयपीएलशी संलग्न असलेले फ्रँचायझी मालक पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करणार नाहीत. या लीगमध्ये एमआय लंडन, सनरायझर्स लीड्स, सदर्न ब्रेव्हज आणि मँचेस्टर सुपर जायंट्स हे चार संघ आयपीएल गटांच्या मालकीचे आहेत. मात्र, अबरार अहमदला विकत घेऊन सनरायझर्स लीड्सने हे सर्व दावे खोटे ठरवले आहेत. या प्रकरणावरून निर्माण झालेला गोंधळ पाहता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डालाही (ECB) स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
उस्मान तारिक ठरला पहिला खरेदी केलेला खेळाडू
अबरार अहमदव्यतिरिक्त पाकिस्तानचा आणखी एक मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक याच्यावरही लिलावात धनवर्षाव झाला. उस्मान तारिक हा या लिलावात विकला जाणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. त्याला बर्मिंगहॅम फिनिक्सने अंदाजे 1.72 कोटी रुपये देऊन खरेदी केले. एकाच लिलावात दोन पाकिस्तानी फिरकीपटूंना मोठी बोली लागल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.
?SUNRISES LEEDS KAVYA MARAN PICK PAKISTANI PLAYERS.? – Abrar Ahmed Sold to Sunrises leeds at INR 2.2 Crore.? First pakisthani player pick by Indian team ?pic.twitter.com/3TYywFfWRd — Sam (@Cricsam01) March 12, 2026
हेही वाचा – Punjab Kings Unveil New Jersey : आयपीएल 2026 साठी पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीचं अनावरण
दिग्गज पाकिस्तानी खेळाडू राहिले अनसोल्ड
लिलावात मिस्ट्री स्पिनर्सनी बाजी मारली असली तरी, पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळालेला नाही. यामध्ये वेगवान गोलंदाज हरिस रौफ, अष्टपैलू शादाब खान आणि फलंदाज सॅम अयुब यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने लिलाव सुरू होण्यापूर्वीच आपले नाव मागे घेतले होते.