के. एल. राहुलचे वादळी शतक अन् रोहित-ऋतुराजची फटकेबाजी; भारताचे वेस्ट इंडिजसमोर 352 धावांचे लक्ष्य

रोहितने आक्रमक पवित्रा घेत 85 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करणाऱ्या ऋतुराजने 69 चेंडूंत 57 धावा जोडून भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले.
के. एल. राहुलचे वादळी शतक अन् रोहित-ऋतुराजची फटकेबाजी; भारताचे वेस्ट इंडिजसमोर 352 धावांचे लक्ष्य
KL Rahul ODI century

KL Rahul ODI Century: के.एल. राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 80 चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामीवीर शुभमन गिल अवघ्या 1 धावेवर बाद झाला, तर त्याच्यापाठोपाठ आलेला विराट कोहली खातेही न उघडता बाद झाल्याने अवघ्या काही धावांत भारताचे 2 प्रमुख फलंदाज माघारी परतले. या कठीण परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारतीय डावाची सूत्रे हाती घेतली. रोहितने आक्रमक पवित्रा घेत 85 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करणाऱ्या ऋतुराजने 69 चेंडूंत 57 धावा जोडून भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले.

के. एल. राहुलचा चौफेर हल्ला; 87 चेंडूंत ठोकल्या नाबाद 129 धावा

रोहित आणि ऋतुराज माघारी परतल्यानंतर के. एल. राहुलने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. राहुलने मैदानाच्या चहूकडे फटकेबाजी करत अवघ्या 87 चेंडूंत 10 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकारांच्या जोरावर नाबाद 129 धावांची स्फोटक शतकी खेळी उभारली. त्याचा स्ट्राइक रेट 148.27 चा राहिला. त्याच्या या आक्रमक शतकामुळे भारतीय संघाला साडेतीनशेचा टप्पा ओलांडता आला.

हेही वाचा – भारत बनला आशियातील हॉकीचा नवा ‘किंग’! महिला संघानंतर आता पुरुष संघानेही जिंकलं सुवर्णपदक

विंडीजसमोर 352 धावांचे कठीण आव्हान

डावाच्या अखेरच्या टप्प्यात तळातील फलंदाजांनीही वेगाने धावा जोडल्या. नमन धीरने 21 चेंडूंत 30 धावांची आक्रमक खेळी केली, तर अंशुल कंबोजने 9 चेंडूंत 17 धावा आणि नितीश कुमार रेड्डीने 9 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 351 धावांचा विशाल डोंगर उभारला. वेस्ट इंडिजकडून सील्सने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर पॉलने 2 गडी बाद केले. आता सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 50 षटकांत 352 धावांचे कठीण आव्हान पार करावे लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version