Friday, June 12, 2026 11:25:11 PM

BCCI Action On Arshdeep Sing: BCCI चा अर्शदीपला मोठा झटका; 'या' गोष्टीवर घातली कायमची बंदी

BCCI ने आयपीएल 2026 हंगामादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

bcci action on arshdeep sing bcci चा अर्शदीपला मोठा झटका या गोष्टीवर घातली कायमची बंदी

BCCI Action On Arshdeep Sing: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2026 हंगामादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आता ब्लॉगिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अर्शदीप आपल्या चाहत्यांसाठी सातत्याने पडद्यामागचे मजेशीर व्हिडिओ (Vlogs) तयार करत असे, मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका व्हिडिओमध्ये सहकारी खेळाडू युझवेंद्र चहल ई-सिगारेट ओढताना दिसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.

'त्या' एका व्हिडिओमुळे अर्शदीप अडचणीत
अर्शदीप सिंग आपल्या भेदक गोलंदाजीसोबतच सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ओळखला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 विश्वचषकाच्या विजयानंतर त्याच्या व्लॉग्सना लाखो व्ह्यूज मिळाले होते. मात्र, नुकत्याच विमानात चित्रीत केलेल्या एका व्हिडिओमध्ये युझवेंद्र चहल ई-सिगारेट ओढताना आढळल्याने बीसीसीआयची प्रतिमा मलीन झाली. या प्रकारामुळे संतापलेल्या बोर्डाने अर्शदीपला कोणत्याही प्रकारचा कंटेंट तयार करण्यापासून रोखले आहे. अर्शदीपसाठी यंदाचा आयपीएल हंगामही फारसा समाधानकारक राहिलेला नाही. 10 सामन्यांत 10.42 च्या इकोनॉमी रेटने त्याने केवळ 11 बळी घेतले आहेत.

आयपीएलमधील बेशिस्तीवर बीसीसीआय आक्रमक
केवळ अर्शदीपच नाही, तर 2026 च्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. मैदानावर मोबाईल फोनचा वापर करणे, हॉटेल किंवा टीम बसमध्ये अनधिकृत व्यक्तींना सोबत ठेवणे आणि रियान परागचा ड्रेसिंग रूममधील ई-सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल होणे, अशा घटनांनी बोर्डाची चिंता वाढवली आहे. आयपीएलची प्रतिष्ठा जपण्यासाठी बीसीसीआयने आता सर्व फ्रँचायझी मालकांना कडक ताकीद दिली असून कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.


सम्बन्धित सामग्री