Mumbai Indians Captain: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघात नेतृत्वाचा नवा अध्याय पाहायला मिळाला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या 58 व्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्सची धुरा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे सोपवण्यात आली आहे. धर्मशाला येथील स्टेडियमवर नाणेफेकीसाठी बुमराह जेव्हा मैदानावर उतरला, तेव्हा तो एका विशेष 'क्लब'चा सदस्य बनला. बुमराहच्या आयपीएल कारकिर्दीत कर्णधारपद सांभाळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एकाच हंगामात तीन कर्णधार: इतिहासाची पुनरावृत्ती
आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात एकाच संघाने तीन वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याची ही केवळ 5 वी घटना ठरली आहे. या हंगामाच्या सुरुवातीला हार्दिक पांड्याकडे नेतृत्व होते, मात्र त्याच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवने ही जबाबदारी स्वीकारली. आता सूर्यकुमार वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यात उपलब्ध नसल्याने, नेतृत्वाची माळ बुमराहच्या गळ्यात पडली आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या इतिहासात 2008 नंतर दुसऱ्यांदा एकाच मोसमात तीन कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे.
एकाच हंगामात 3 कर्णधार नेमणारे संघ
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 5 वेळा अशा प्रकारचा बदल पाहायला मिळाला आहे:
मुंबई इंडियन्स (2008): हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॉक.
पुणे वॉरियर्स इंडिया (2013): अँजेलो मॅथ्यूज, रॉस टेलर आणि ॲरॉन फिंच.
सनरायझर्स हैदराबाद (2021): डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि मनीष पांडे.
पंजाब किंग्स (2024): शिखर धवन, सॅम करन आणि जितेश शर्मा.
मुंबई इंडियन्स (2026): हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह.
कर्णधारपदाबाबत काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीवर बोलताना बुमराहने स्पष्ट केले की, 'सूर्या' वैयक्तिक कारणांमुळे हा सामना खेळत नाहीये. कर्णधारपदाच्या नव्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी वयाच्या 19 व्या वर्षी संघात आलो होतो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. एक कर्णधार म्हणून तुम्हाला सर्वांची काळजी घेत स्वतःचे योगदान द्यावे लागते. या हंगामातील उर्वरित सामन्यांकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत."
मुंबई इंडियन्सचा 10 वा कर्णधार
या नियुक्तीसह जसप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा 10 वा खेळाडू ठरला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आतापर्यंत अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे, मात्र आता कर्णधार म्हणून त्याच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम नेतृत्वाच्या बाबतीत अस्थिर राहिला असला तरी, बुमराहच्या रूपाने संघाला एक नवा आणि अनुभवी नेतृत्व चेहरा मिळाला आहे.