Domestic Cricket New Rules: भारतीय देशांतर्गत क्रिकेट मोसमात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि खेळातील पारदर्शकता वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नियमावलीत आमूलाग्र बदल केले आहेत. आगामी 2026-27 या मोसमापासून हे नवीन नियम लागू होतील. नव्या नियमांनुसार, कोणत्याही गोलंदाजाने जाणीवपूर्वक 'फ्रंट-फूट नो-बॉल' किंवा अत्यंत धोकादायक बीमर चेंडू टाकल्यास त्याला फक्त संबंधित डावातच नव्हे, तर संपूर्ण सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम; MCC च्या शिफारशींनुसार नियमात कडक सुधारणा
यापूर्वी अशा प्रकारच्या चुकीसाठी गोलंदाजाला केवळ त्या डावातील उर्वरित षटके टाकण्यास मज्जाव केला जात होता. मात्र, मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) सूचना लक्षात घेऊन बोर्डाने या नियमात अधिक कडक पावले उचलली आहेत. एखादा नो-बॉल मुद्दाम टाकला गेला आहे की नाही, याचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मैदानावरील पंचांकडे असतील. या निर्णयाची अधिकृत माहिती सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पाठवण्यात आली आहे.
दिवसाचे शेवटचे षटक पूर्ण करणे बंधनकारक अन् डाव घोषित करण्यावर निर्बंध
सामन्याच्या दिवसाचा खेळ संपताना शेवटच्या षटकात फलंदाज बाद झाल्यास पूर्वी लगेचच खेळाची वेळ संपवली जात असे. आता नव्या नियमानुसार, विकेट पडली तरी ते षटक पूर्ण करावेच लागेल, जेणेकरून नवीन फलंदाजाला क्रीझवर येण्याची संधी मिळेल. याशिवाय, सामन्याच्या चौथ्या किंवा अंतिम डावात डाव घोषित करणे किंवा सोडण्याचा (Forfeit) पर्याय आता रद्द करण्यात आला आहे. सामन्याच्या निकालांमध्ये होणारी संभाव्य फेरफार रोखण्यासाठी 'नियम 15.2' मध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.
ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मुख्य प्रशिक्षकांना मैदानावर प्रवेश; 'दुलीप ट्रॉफी'पासून अंमलबजावणी
एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये 'ड्रिंक्स ब्रेक' दरम्यान संघाच्या मुख्य प्रशिक्षकांना मैदानात जाऊन खेळाडूंशी चर्चा करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच यष्टिरक्षकाच्या हातमोज्यांबाबतचे नियम थोडे शिथिल करण्यात आले असून, चेंडू टाकण्याच्या क्षणीच हातमोजे स्टंप्सच्या मागे असणे पुरेसे मानले जाईल. आगामी महिन्यात 'दुलीप ट्रॉफी'ने देशांतर्गत हंगामाचा श्रीगणेशा होत असल्याने, या स्पर्धांआधी पंच आणि मॅच रेफ्रींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करून या 100 टक्के नव्या नियमांचे धडे दिले जातील.