Varun Sanyal: जपानमधील आइची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पथकाला एका मोठ्या धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले आहे. भारताचा प्रमुख एमएमए (MMA – मिक्स्ड मार्शल आर्ट्स) फायटर वरुण सन्याल याचा आशियाई स्पर्धेतील प्रवास अत्यंत दुर्दैवी पद्धतीने संपुष्टात आला आहे. वजनाची अनिवार्य अट पूर्ण करण्यासाठी सन्याल 'सौना'मध्ये गेला असताना, पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास हा 27 वर्षीय खेळाडू तिथेच अचानक बेशुद्ध पडला. सुदैवाने, एका नेपाळी खेळाडूच्या ही गोष्ट वेळीच लक्षात आली आणि त्याने तात्काळ सन्यालला वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांपर्यंत पोहोचवले. मात्र, या गंभीर घटनेनंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी त्याला सामन्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या 'अनफिट' घोषित केले, ज्यामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर-फायनल) सहभाग घेता आला नाही.
तातडीची वैद्यकीय मदत आणि स्पर्धेतून बाहेर
घटनेची माहिती मिळताच एमएमए इंडियाचे अध्यक्ष निखिल कुंदर यांच्यासह भारतीय अधिकारी तातडीने सन्यालच्या मदतीसाठी धावले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत असे निष्पन्न झाले की, वरुण सन्यालला स्नायूंचे तीव्र पेटके (muscle cramps) आणि गंभीर निर्जलीकरण (dehydration) यांचा त्रास होत होता. प्रकृतीचा धोका लक्षात घेता त्याला वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयामुळे अत्यंत कठीण मेहनत करून, लंडन ते मुंबई आणि सिंगापूरमार्गे असा दीर्घ प्रवास करून नागोया येथे पोहोचलेल्या सन्यालचे आशियाई पदकाचे स्वप्न रिंगमध्ये उतरण्यापूर्वीच भंगले.
ॲक्रेडिटेशन आणि निवासाचा नाहक त्रास
आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा (MMA) समावेश करण्यात आला असून, वरुण सन्याल पुरुष गटात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु जपानमध्ये पोहोचल्यापासूनच त्याला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. अधिकृत सिस्टीममध्ये त्याची 'ॲक्रेडिटेशन' (ओळख नोंदणी) वेळेत न झाल्यामुळे त्याला तब्बल 10 तासांहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागली. अत्यंत त्रासानंतर त्याला राहण्यासाठी खोली मिळाली खरी, पण त्यावर आधीच इतर 2 भारतीय खेळाडूंनी दावा ठोकला होता. या सर्व धावपळीमुळे सन्याल प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकव्याने ग्रासला होता.
आयोजनातील सावळागोंधळ आणि खेळाडूंचे हाल
या सातत्यपूर्ण त्रासामुळे सन्यालला स्पर्धेपूर्वी वेळेत योग्य आहार घेणे आणि वजन नियंत्रित करणे अशक्यप्राय झाले. 'मी जेव्हा अंथरुणावर पोहोचलो, तेव्हा माझे शरीर पूर्णपणे थकलेले होते, अशा शब्दांत सन्यालने आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे, हा त्रास केवळ सन्यालपुरता मर्यादित नव्हता; 'गेम्स व्हिलेज'मध्ये पोहोचलेल्या इतर अनेक देशांच्या खेळाडूंनाही खोल्या मिळण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागली. आयोजकांच्या या सावळ्या गोंधळामुळे आणि अव्यवस्थापनामुळे एका भारतीय खेळाडूला थेट स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.