T20 New Captain: टी-20 वर्ल्ड कप 2026 चे जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वावर आणि विशेषतः त्याच्या घसरत्या कामगिरीवर बीसीसीआय (BCCI) नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अहवालानुसार, लवकरच सूर्याला टी-20 च्या कर्णधारपदावरून बाजूला करून एका नव्या चेहऱ्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
सूर्याचा फॉर्म की दुखापत? नेमकं कारण काय?
वर्ल्ड कप जिंकूनही वैयक्तिक स्तरावर सूर्यकुमार अपयशी ठरताना दिसत आहे. त्याच्या या खराब फॉर्ममागे उजव्या मनगटाची जुनी दुखापत कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आयपीएल दरम्यान तो मनगटावर जाड टेपिंग लावून खेळताना दिसला, ज्यामुळे त्याच्या फटकेबाजीवर मर्यादा येत आहेत. अमेरिकेविरुद्धची खेळी वगळता मोठ्या सामन्यांमध्ये सूर्याची बॅट शांत राहिली आहे. 45 सामन्यांतील त्याची आकडेवारी त्याच्या जुन्या 'मिस्टर 360' प्रतिमेला साजेशी नाही.
श्रेयस अय्यर शर्यतीत सर्वात पुढे
निवड समिती आता 2028 ऑलिम्पिक आणि आगामी जागतिक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून दीर्घकालीन नेतृत्वाचा विचार करत आहे. या शर्यतीत श्रेयस अय्यर याचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. कठीण परिस्थितीत संयम राखण्याची श्रेयसची क्षमता निवडकर्त्यांना भावत आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कर्णधारपदाचा दांडगा अनुभव श्रेयसच्या बाजूने कौल देणारा ठरत आहे.
निवड समितीचा नवा 'प्लॅन'
बीसीसीआयच्या थिंक-टँकनुसार, सूर्यावर फलंदाजीचा भार अधिक असल्याने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यास तो मोकळेपणाने खेळू शकेल. दुसरीकडे, श्रेयस अय्यरला संघात पुनरागमन करण्यासोबतच थेट नेतृत्वाची धुरा देऊन मध्य फळीला स्थिरता देण्याचा बोर्डाचा मानस आहे. सूर्यकुमारने पुढील दोन वर्षे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी फिटनेस आणि फॉर्मच्या मुद्द्यावर निवड समिती कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतीय टी-20 संघाला नवा 'कॅप्टन' मिळण्याची दाट शक्यता आहे.