ODI World Cup 2027 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक पुढील वर्षी खेळवला जाणार असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आतापासूनच त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्य स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या पात्रता फेरीच्या (Qualifying Tournament) तारखा आयसीसीने निश्चित केल्या आहेत. हे महत्त्वाचे सामने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यादरम्यान आयोजित केले जातील. स्पर्धेची रूपरेषा अत्यंत रंजक असणार आहे; परंतु पात्रता फेरीचे सामने नेमके कुठे खेळवले जाणार, या ठिकाणांवर अंतिम निर्णय होणे अद्याप बाकी आहे.
22 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान पार पडणार पात्रता फेरी
2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारे संघ निश्चित करण्यासाठी पात्रता फेरीची स्पर्धा तब्बल एक महिना चालणार आहे. ही फेरी पुढील वर्षी 22 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान आयोजित केली जाणार आहे. मुख्य वर्ल्ड कपच्या अधिकृत तारखांची घोषणा अद्याप झाली नसली, तरी ही महास्पर्धा 4 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान पार पडण्याची दाट शक्यता आहे. यावेळचा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणार असून, या देशांमधील एकूण 12 मैदानांवर सामने रंगतील.
पात्रता फेरीचे स्वरूप अन् रंजक 'सुपर सिरीज'
वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत एकूण 10 देश आमने-सामने असतील. यातील अव्वल कामगिरी करणारे संघ थेट 14 संघांच्या मुख्य वर्ल्ड कप स्पर्धेत प्रवेश करतील. या स्पर्धेत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघांमध्ये 'सुपर सिरीज' ही विशेष मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील सर्वोत्कृष्ट संघ 12 व्या स्थानी राहून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवेल. ही 'सुपर सिरीज' मुख्य वर्ल्ड कपचाच एक भाग मानली जाणार आहे.
आयसीसी रँकिंगची कट-ऑफ तारीख
पात्रता फेरीत कोणते संघ खेळतील हे ठरवण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 ही कट-ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या 8 क्रमांकांवर असणारे संघ थेट मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. तर रँकिंगमधील तळाच्या 2 संघांना पात्रता फेरीत उतरावे लागेल. यजमान देश म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे आधीच थेट पात्र झाले आहेत. त्यामुळे 10 संघांच्या या पात्रता फेरीत रँकिंगमधील तळाचे 2 संघ, 'क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2' मधील अव्वल 4 संघ आणि 'वर्ल्ड कप क्वालिफायर प्ले-ऑफ' मधील 4 संघ सहभागी होतील.
हेही वाचा – Duleep Trophy 2026 : दुलीप करंडकसाठी नॉर्थ झोनचा संघ जाहीर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी
'क्वालिफायर प्ले-ऑफ' मधील संघांची गणितं
वर्ल्ड कप क्वालिफायर प्ले-ऑफच्या टप्प्यात एकूण 8 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. यात 'क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2' मधील तळाचे 4 संघ (म्हणजेच 5 व्या ते 8 व्या स्थानावरील संघ) आणि 'चॅलेंज लीग'मधील अव्वल 4 संघ खेळतील. या 8 संघांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणारे 4 संघ मुख्य 'वर्ल्ड कप क्वालिफायर' फेरीत आपली जागा पक्की करतील.