Monday, May 11, 2026 10:44:51 AM

T20 World Cup 2026 Match Fixing: 2026 टी-20 विश्वचषकामध्ये 'मॅच-फिक्सिंग? ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले खरे, मात्र स्पर्धा संपून महिना उलटल्यानंतर 'मॅच-फिक्सिंग'चे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

t20 world cup 2026 match fixing 2026 टी-20 विश्वचषकामध्ये मॅच-फिक्सिंग icc च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू

T20 World Cup 2026 Match Fixing: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडलेला 2026 चा टी-20 विश्वचषक आता एका मोठ्या वादात सापडला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले खरे, मात्र स्पर्धा संपून महिना उलटल्यानंतर 'मॅच-फिक्सिंग'चे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACU) या स्पर्धेतील एका विशिष्ट सामन्याबाबत भ्रष्टाचार आणि सामना-निश्चितीच्या संशयावरून चौकशी सुरू केली आहे.

कॅनडा-न्यूझीलंड सामन्यातील 'त्या' षटकावर संशय
या चौकशीचे मुख्य केंद्र विश्वचषकातील 31 वा सामना आहे, जो कॅनडा आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याने टाकलेले एक षटक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 'ईएसपीएन क्रिकइन्फो'च्या अहवालानुसार, न्यूझीलंडच्या डावातील पाचव्या षटकावर आयसीसीने लक्ष केंद्रित केले आहे. या षटकात दिलप्रीतने एक नो-बॉल आणि लेग-साइडला वाईड चेंडू टाकत एकूण 15 धावा दिल्या होत्या. याआधीच्या गोलंदाजांनीही महागडी षटके टाकली असताना, फिरकीपटू साद बिन जफरने टाकलेले 'विकेट-मेडन' षटक आणि दिलप्रीतची खराब गोलंदाजी यामुळे संशयाला बळ मिळाले आहे.

माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर खळबळ
कॅनडाच्या राष्ट्रीय प्रसारक वाहिनीने (CBC) 'द फिफ्थ इस्टेट' या कार्यक्रमांतर्गत 'भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि क्रिकेट' नावाचा एक शोधपर माहितीपट प्रदर्शित केला. या 43 मिनिटांच्या माहितीपटात कॅनडाच्या क्रिकेटमधील अंतर्गत अनियमितता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयसीसी नियमांच्या उल्लंघनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या माहितीपटाच्या प्रसारणानंतरच आयसीसीने तातडीने चौकशीचे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा - Virat Kohli: 'अनुष्का वहिनी बघताय ना...'; विराट कोहली पुन्हा सोशल मीडियावरील वादात अडकला; 'त्या' फोटोवरील एका 'लाईक'ने इंटरनेटवर खळबळ

प्रशिक्षक आणि बोर्ड सदस्यांमधील वादाचे पदर
केवळ सामन्यातील कामगिरीच नाही, तर 'क्रिकेट कॅनडा' बोर्डाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एका जुन्या टेलिफोन रेकॉर्डिंगच्या आधारे अशी माहिती समोर आली आहे की, तत्कालीन प्रशिक्षक खुर्रम चोहन यांनी बोर्ड सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. वरिष्ठ बोर्ड सदस्य विशिष्ट खेळाडूंचा संघात समावेश करण्यासाठी प्रशिक्षकांवर अवाजवी दबाव आणत असल्याचे या रेकॉर्डिंगमधून उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आता आयसीसी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर काढणार का, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या