मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघ सज्ज झाला असून संघ मोहिमेची सुरुवात 29 मार्च 2026 पासून करणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होणार असून हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी संघातील खेळाडूंमध्ये समन्वय आणि एकात्मता वाढवण्यासाठी नेहमीप्रमाणे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यंदा या कार्यक्रमाला ‘द मिक्स’ असे नाव देण्यात आले होते. या कार्यक्रमात संघातील खेळाडूंनी मनमोकळा वेळ घालवत एकमेकांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान माजी कर्णधार रोहित शर्मा याने चाहत्यांशी संवाद साधत आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण केले. त्याने चाहत्यांना आश्वासन दिले की, यंदाच्या हंगामात संघ सहावे विजेतेपद जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल.
मुंबई इंडियन्सने 2020 पर्यंत तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतरच्या हंगामांमध्ये संघाला अपेक्षित यश मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून संघाची धुरा हार्दिक पांड्या याच्याकडे आहे. 2024 मध्ये संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला होता, तर मागील हंगामात सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी केवळ एकच विजय मिळवता आला होता. त्यानंतर संघाने दमदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला, मात्र अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.
ABSOLUTE SCENES AT #THEMIX!! ? pic.twitter.com/qM3ZGN9X2N — Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2026
मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘द मिक्स’ या कार्यक्रमात संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनातील सदस्य सहभागी झाले होते. कर्णधार हार्दिक पांड्या त्याची मैत्रीण माहिका शर्मासह कार्यक्रमाला उपस्थित होता, तर रोहित शर्मा त्याच्या मुलीसह कार्यक्रमात दिसला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात चाहत्यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.
चाहत्यांशी संवाद साधताना रोहित शर्मा म्हणाला, “तुमच्या सर्वांसाठी आम्ही सहावे विजेतेपद जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.” यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ संतुलित आणि मजबूत दिसत असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः फलंदाजी ही संघाची मोठी ताकद मानली जात आहे.
"Iss baar, number 6️⃣!" ?? pic.twitter.com/zTZ4BwIzcY — Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2026
संघात रोहित शर्मा याच्यासोबत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रायन रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक यांसारखे दमदार फलंदाज आहेत. त्यामुळे आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजेतेपदासाठी जोरदार दावेदारी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Fishing Industry: मच्छीमारी व्यवसायाला ‘डिझेल’ची झळ; दरवाढीमुळे मासेमारीचे गणित कोलमडले