IPL 2026: नाशिकचे दोन खेळाडू आयपीएलमध्ये! एकाची CSKमध्ये निवड, तर दुसरा कोणत्या संघात जाणार?

आयपीएल 2026 हंगामात नाशिकच्या दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.

IPL 2026: नाशिकचे दोन खेळाडू आयपीएलमध्ये! एकाची CSKमध्ये निवड, तर दुसरा कोणत्या संघात जाणार?

IPL 2026: नाशिकने गेल्या काही वर्षांत क्रिकेटच्या विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच नाशिकमधील दोन तरुण क्रिकेटपटूंनी आगामी इंडियन प्रीमियर लीग 2026 हंगामात आपली दमदार एंट्री नोंदवली आहे. रामकृष्ण घोष आणि साहिल पारख ही दोन्ही नावे सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहेत. दोघांचे प्रवास वेगवेगळे असले तरी लक्ष्य एकच – आयपीएलमधून मोठ्या स्तरावर स्वतःला सिद्ध करणे.

प्रथम रामकृष्ण घोषबद्दल. अष्टपैलू क्षमतेमुळे रामकृष्णकडे अनेक वर्षांपासून लक्ष वेधले जात होते. मागील हंगामात त्याची चेन्नई सुपर किंग्ज संघात निवड झाली होती. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या संघात असण्याचं भाग्य त्याला लाभलं. जरी त्याला गेल्या हंगामात फारशी खेळण्याची संधी मिळाली नसेल, तरी CSK व्यवस्थापनाने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्याला रिटेन केले आहे. यामुळे या हंगामात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळू शकते. आयुष्य म्हात्रेप्रमाणेच रामकृष्ण देखील यंदा चमक दाखवेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

दुसरीकडे, नाशिकचा आणखी एक दमदार खेळाडू साहिल पारख. महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये त्याचे नाव झपाट्याने पुढे येताना दिसत आहे. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत त्याने राज्याच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले. नेतृत्वगुणामुळे तो महाराष्ट्र अंडर-19 संघाचा कर्णधार राहिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अंडर-19 संघाकडूनही त्याने भूमिका बजावली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त 75 चेंडूत नाबाद 109 धावा ठोकून सर्वांचे लक्ष वेधले. डावखुऱ्या सलामीवीराची ही आक्रमक शैली आयपीएल संघांसाठी आकर्षण ठरू शकते.

साहिल पारख पहिल्यांदा आयपीएल लिलावात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणत्या फ्रँचायझीची नजर असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याच्या कामगिरीनुसार एका मोठ्या किंमतीत त्याची निवड होण्याची दाट शक्यता मानली जाते.

दरम्यान, आयपीएल 2026 चा लिलाव 16 डिसेंबर 2025 रोजी अबुधाबी येथे होणार आहे. या लिलावात एकूण 350 खेळाडूंचा समावेश असून त्यापैकी तब्बल 240 भारतीय आहेत. त्यामुळे स्पर्धा प्रचंड कठीण असणार आहे.

नाशिकमधील या दोन्ही युवा प्रतिभांनी स्थानिक पातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तराकडे सुरू केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निवडीमुळे नाशिकमध्ये आनंदाचे वातावरण असून येणाऱ्या काळात ही दोन्ही नावे मोठ्या चर्चेत राहणार हे निश्चित.

आता चाहत्यांना केवळ एवढीच उत्सुकता धोनीच्या संघात रामकृष्ण कधी मैदानात उतरणार आणि साहिल कोणत्या संघाच्या जर्सीमध्ये चमकणार? क्रिकेटप्रेमींचे लक्ष आगामी लिलाव आणि हंगामाकडे खिळले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number