Rohit Sharma : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात किवीज संघाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 गडी गमावून 337 धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले. मात्र, हा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी वैयक्तिकरित्या अत्यंत खास ठरला. मैदानात पाऊल ठेवताच रोहितने एक विशेष शतक साजरे केले, ज्यामुळे तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत जाऊन बसला आहे.
घरच्या मैदानावर 100 वा एकदिवसीय सामना
रोहित शर्माने आज भारतातील आपला 100 वा एकदिवसीय सामना खेळण्याची कामगिरी केली. अशा प्रकारे घरच्या मैदानावर सामन्यांचे शतक पूर्ण करणारा तो भारताचा केवळ सहावा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनीच हा टप्पा गाठला होता. भारतात खेळलेल्या 100 सामन्यांमधील 99 डावांमध्ये रोहितने 55.75 च्या सरासरीने 5074 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 14 शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा - Indian Cricket Team: विराट आणि रोहित आता क्रिकेट खेळणार नाहीत? नेमकं काय घडलंय...
भारतात सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारे भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर - 164 सामने
विराट कोहली - 130 सामने
एमएस धोनी - 127 सामने
मोहम्मद अझरुद्दीन - 113 सामने
युवराज सिंग - 108 सामने
रोहित शर्मा - 100 सामने
हेही वाचा - Women Cricket Team: विश्वविजेत्या टीम इंडियाचे आता 'मिशन ऑस्ट्रेलिया'वर लक्ष; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
दरम्यान, 2025 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये होता, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहितने केवळ 20.33 च्या सरासरीने 61 धावा केल्या. चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना या मालिकेत त्याची बॅट शांत राहिल्याचे पाहायला मिळाले.