Tuesday, March 17, 2026 03:34:31 PM

IND vs PAK Match: हायव्होल्टेज सामन्याची थरारक सुरुवात; टॉस जिंकताच पाकिस्तानचा मोठा डाव, भारतासमोर आव्हान

भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

ind vs pak match हायव्होल्टेज सामन्याची थरारक सुरुवात टॉस जिंकताच पाकिस्तानचा मोठा डाव भारतासमोर आव्हान

IND vs PAK Match: भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटविश्वातील सर्वात मोठा थरार मानला जातो. यावेळीही मैदानात उतरण्यापूर्वीच या सामन्याभोवती नाट्यमय घडामोडी घडल्या. सुरुवातीला पाकिस्तान सरकारकडून सामन्यावर बहिष्काराचा इशारा देण्यात आला होता. मात्र इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (ICC) कडून स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानने अखेर सामना खेळण्याचा निर्णय घेतला आणि क्रिकेट चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

तथापि, राजकीय वाद शांत होताच आता हवामानाने नवीन चिंता निर्माण केली आहे. सामना कोलंबो येथे होत असून हवामान खात्याने रात्री पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारपासूनच आकाश ढगाळ असल्याने सामना पूर्ण होईल का, याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे मैदानातील लढतीइतकीच नजर आता आकाशाकडे लागली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी थोडी चिकट आणि संथ असल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीच्या षटकांत गोलंदाजांना मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत संघात कोणताही बदल नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. संघातील वातावरण सकारात्मक असून मोठ्या सामन्यासाठी सर्वजण सज्ज असल्याचेही तो म्हणाला.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉसनंतर सांगितले की, संघाला आधी फलंदाजी करायची होती. अलीकडील दोन सामन्यांत लक्ष्याचा यशस्वी बचाव केल्यामुळे त्याच रणनीतीवर ठाम असल्याचे त्याने नमूद केले. क्रिकेटमध्ये कोणत्याही दिवशी कोणताही संघ जिंकू शकतो, त्यामुळे संयम आणि एकाग्रता महत्त्वाची असल्याचे त्याने सांगितले.

या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांची पुनरागमन झाले आहे. संघाची गोलंदाजी आक्रमक ठेवण्यासाठी जसप्रीत बुमराह याच्यासह अनुभवी खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल.

एकीकडे राजकीय तणाव, दुसरीकडे पावसाचे सावट आणि मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी या सगळ्यामुळे हा सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थरार, भावना आणि अनिश्चिततेचा संगम ठरला आहे. चाहत्यांना आता फक्त एकच अपेक्षा आहे. पावसाने अडथळा आणू नये आणि हा महासंग्राम पूर्ण रंगात पार पडावा.


सम्बन्धित सामग्री