Vaibhav Suryavanshi Record: भारतीय युवा क्रिकेटचा उगवता तारा वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या बॅटने मैदानात आग ओकत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा एकदिवसीय (U-19 ODI) मालिकेत वैभवने स्फोटक फलंदाजी करत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
पंतचा 18 चेंडूंचा विक्रम आता इतिहासजमा
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वैभवने मैदानावर उतरताच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने केवळ 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याआधी युवा एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, ज्याने 18 चेंडूत ही कामगिरी केली होती. वैभवने आता हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
24 चेंडूत 68 धावांचा पाऊस
अर्धशतकानंतरही वैभवची फटकेबाजी सुरूच होती. त्याने एकूण 24 चेंडूंचा सामना करताना 68 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, त्याच्या या खेळीत त्याने तब्बल 10 षटकार आणि 1 चौकार लगावला. याचाच अर्थ त्याच्या एकूण धावांपैकी 64 धावा या केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने आल्या होत्या. धावगती वाढवण्याच्या नादात तो बाद झाला, अन्यथा तो शतकाच्या दिशेने वेगाने कूच करत होता.
हेही वाचा – Shikhar Dhawan : ठरलं! दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार शिखर धवन; कोण आहे सोफी शाइन
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 49.3 षटकांत सर्वबाद 245 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पावसाने व्यत्यय आणला, ज्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी 27 षटकांत 174 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. कर्णधार वैभव सूर्यवंशीने दिलेल्या स्फोटक सुरुवातीमुळे भारताने हे लक्ष्य अत्यंत सहजपणे पूर्ण केले आणि शानदार विजय नोंदवला. या विजयासह भारतीय युवा संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली आहे. आता मालिकेतील औपचारिकता असलेला तिसरा आणि अंतिम सामना 7 जानेवारी रोजी खेळवला जाईल.