बंगळूर: आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bengaluru, RCB) संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आरसीबी त्यांचा पहिला सामना 28 मार्च 2026 रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी संघाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनबाबत उत्सुकता कायम आहे. सलामीची जोडी जवळपास निश्चित मानली जात असली तरी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा संघ व्यवस्थापनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीने त्याला 21 कोटी रुपयांत कायम ठेवले आहे. त्याच्यासोबत इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज फिल सॉल्ट सलामीला येऊ शकतो. सॉल्टला आरसीबीने 11 कोटी रुपयांत संघात ठेवले आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सॉल्ट पॉवरप्लेच्या षटकांमध्ये वेगाने धावा करण्याची क्षमता ठेवतो. मागील हंगामात या जोडीने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे ही जोडी कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी देवदत्त पडिक्कल आणि वेंकटेश अय्यर यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. पडिक्कलने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने तब्बल 721 धावा करत 100 पेक्षा जास्त सरासरी राखली होती. या दमदार कामगिरीमुळे तो क्रमांक तीनसाठी सर्वात मजबूत दावेदार मानला जात आहे.
New season, but same old ????????? vibes at the Chinnaswamy!?? Some familiar faces, some new ones at our first training sesh of #IPL2026. ?✨#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/NN6sAs2c0H — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 18, 2026
दुसरीकडे वेंकटेश अय्यरलाही संघाने सात कोटी रुपयांत खरेदी केले आहे. तो आक्रमक फलंदाज असण्यासोबतच मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. ही अतिरिक्त क्षमता संघासाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट चांगला मानला जातो, जो टी20 क्रिकेटमध्ये महत्त्वाचा ठरतो.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने या चर्चेत त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते, आरसीबीने तिसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कललाच संधी द्यावी. एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी वेंकटेश अय्यरच्या पॉवर हिटिंगसाठी अनुकूल असू शकते, असे तो मान्य करतो. मात्र पडिक्कलची सध्याची देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट फॉर्म आणि त्याने केलेल्या अनेक शतकांमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळायला हवे, असे रैनाचे मत आहे. तसेच पडिक्कल डावखुरा फलंदाज असल्याने संघाच्या वरच्या क्रमात डावखुरा-उजव्या हाताचा चांगला समतोल राखला जाऊ शकतो.
आरसीबीकडे यंदा फलंदाजीत अनेक मजबूत पर्याय उपलब्ध आहेत. जर पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर खेळला, तर कर्णधार रजत मधल्या फळीमध्ये पाचव्या क्रमांकावर उतरू शकतो. तर जितेश शर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत डावाला स्थिरता देऊ शकतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर यंदा ‘हेडेक ऑफ प्लेंटी’ म्हणजेच पर्यायांची मुबलकता असून अंतिम प्लेइंग इलेव्हन ठरवणे हेच सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.