अपघातानंतर पुन्हा मैदानावर परतून आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीचं उदाहरण ठरलेला ऋषभ पंत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या संघर्षमय प्रवासाला सलाम.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या गंभीर कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या कारकिर्दीवर काळं सावट पसरलं होतं. डॉक्टरांनी दीर्घ पुनर्वसनाची गरज असल्याचं सांगितलं, आणि अनेकांनी त्याचा क्रिकेटमधील भविष्यासंदर्भात शंका व्यक्त केली. पण पंतने हार मानली नाही. अनेक शस्त्रक्रिया, महिनोंमहिने चाललेली फिजिओथेरपी आणि अमर्याद धैर्य यांच्या जोरावर त्याने स्वतःला पुन्हा तयार केलं.
2024 च्या आयपीएल हंगामात मैदानावर पुनरागमन करताना ऋषभ पंत केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर प्रेरणास्त्रोत म्हणून उदयास आला. प्रत्येक धाव, प्रत्येक झेल आणि प्रत्येक शॉट त्याच्या मनोबलाची साक्ष देत होता. अपघातानंतरचा हा परतावा त्याच्या जीवनाचा सर्वात मोठा विजय ठरला.
बालपण आणि अंडर-19 कारकीर्द
1997 साली उत्तराखंड मधील रुरकी येथे जन्मलेल्या ऋषभ पंतने अतिशय लहान वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुढे तो दिल्लीला स्थलांतरित झाला, जिथे त्याने प्रसिद्ध प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. सिन्हा अनेक भारतीय खेळाडू घडविण्यासाठी ओळखले जाणारे प्रशिक्षक आहेत.
2016 मध्ये पंतने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. नेपाळविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या फटकेबाज फलंदाजीने तो स्पर्धेतील अव्वल धावसंख्या करणाऱ्यांपैकी एक ठरला आणि त्यानंतर त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण आणि प्रगती
पंतने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकून त्याने आपली ओळख “आक्रमक फलंदाज” अशी करून दिली. त्याच वर्षी ‘द ओव्हल’ मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिले टेस्ट शतक झळकावत तो त्या वयात असे करणारा दुसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला.
आक्रमक फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातील वेग आणि अचूकता यामुळे पंत भारतीय संघातील सर्व फॉरमॅटमध्ये एक स्थिर आणि विश्वासार्ह खेळाडू बनला.
गब्बा टेस्ट, करिअरमधील सर्वोच्च क्षण
2020-21 च्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर खेळलेली पंतची खेळी आजही क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाते. भारतासमोर 328 धावांचे आव्हान असताना, पंतने 89 नाबाद धावा करून संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. हा भारताचा गब्बा मैदानावरील पहिला मालिका विजय ठरला.
या खेळीमुळे पंत केवळ सामना जिंकवणारा नव्हे, तर संघाला प्रेरणा देणारा योद्धा ठरला. त्याच्या शांततेने, आत्मविश्वासाने आणि निर्धाराने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला.
अपघातानंतरचा संघर्ष आणि पुनरागमन
डिसेंबर 2022 मध्ये पंत एका गंभीर कार अपघातात जखमी झाला. त्याच्या गुडघा आणि पायांवर गंभीर दुखापती झाल्या, अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यानंतर महिनोंमहिने पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू राहिली. या काळात त्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. परंतु, पंतने हिम्मत न हरता पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केले आणि खेळात परतण्याचे ध्येय ठेवले.
2024 च्या आयपीएल हंगामात त्याने पुनरागमन करत चाहत्यांना भावनिक क्षण दिला. मैदानावर परतताना पंतने फक्त शारीरिक नाही तर मानसिक बळाचेही दर्शन घडवले. प्रत्येक धाव, प्रत्येक झेल त्याच्या जिद्दीची साक्ष देत होती.
आयपीएल कारकीर्द आणि नवे पर्व
2016 मध्ये दिल्ली फ्रँचायझीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करताना पंतला फार कमी लोक ओळखत होते. पण काही वर्षांतच तो स्पर्धेतील सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक ठरला. त्याने 100 हून अधिक सामने खेळले, 3,200 पेक्षा जास्त धावा केल्या, 20 हून अधिक अर्धशतके झळकावली आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखला.
कर्णधार म्हणून त्याने दिल्ली कॅपिटल्सला अनेकदा प्लेऑफ आणि अंतिम फेरीत नेले. 2025 मध्ये पंतने नवीन पर्वाची सुरुवात करत लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून विक्रमी 27 कोटींच्या करारावर सही केली. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला.
लक्झरी जीवनशैली आणि संपत्ती
क्रिकेट कारकिर्दी एवढेच पंतचे ऑफ-फील्ड जगही चर्चेत असतो. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. Audi A8, Ford Mustang GT, Mercedes-Benz GLC SUV आणि Mercedes-Benz GLE यांचा समावेश आहे.
एका अहवालानुसार, सध्या ऋषभ पंतची एकूण संपत्ती सुमारे 100 कोटी (सुमारे 12.2 मिलियन डॉलर) इतकी आहे. या मूल्यात त्याचे आयपीएलचे मानधन, BCCI केंद्रीय करार, तसेच ब्रँड अँडोर्समेंट्स आणि वैयक्तिक गुंतवणुकींचा समावेश आहे.
व्यवसायिक गुंतवणुकींची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही, मात्र अहवालानुसार पंतकडे दोन मालमत्ता आहेत. त्यापैकी एक त्याच्या मूळगावी रुरकी, उत्तराखंड येथे असून तिची किंमत 60 लाख ते 1कोटी दरम्यान असल्याचं सांगितलं जातं.
ऋषभ पंतचा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने “कधीही हार मानू नकोस” या भावनेचं जिवंत उदाहरण. गंभीर अपघातातून सावरून पुन्हा मैदानावर परतलेल्या या तरुणाने दाखवून दिलं की जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही.
अंडर-19 स्टारपासून ते अपघातावर मात करून आयपीएल पुनरागमन करत स्टार क्रिकेटर पर्यंतची पंतची कहाणी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रेरणादायी अध्यायांपैकी एक ठरली आहे.