Rohit Sharma: हिटमॅनची नवी इनिंग! रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कप 2026चा ब्रँड ॲम्बेसेडर

आयसीसीने रोहित शर्माची टी20 वर्ल्ड कप 2026साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

Rohit Sharma: हिटमॅनची नवी इनिंग! रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कप 2026चा ब्रँड ॲम्बेसेडर

Rohit Sharma: भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी मात्र कारण त्याची धडाकेबाज फलंदाजी किंवा नेतृत्व नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्यावर सोपवलेली एक प्रतिष्ठेची जबाबदारी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 2026 मध्ये होणाऱ्या टी20 क्रिकेट विश्वचषकासाठी रोहित शर्माची अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

ही घोषणा स्वतः ICC चेअरमन जय शाह यांनी केली. गेल्या वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानंतर लगेचच रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय आणि नंतर टेस्ट क्रिकेटलाही निरोप दिला. सध्या तो फक्त वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. अशा स्थितीत सक्रिय खेळाडूला ICC च्या जागतिक स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवणे ही क्रिकेटजगतात फारच दुर्मिळ घटना समजली जाते.

हेही वाचा: T20 World Cup 2026 : मोठी बातमी! टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार कधी रंगणार

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना रोहितने ही जबाबदारी ‘मोठा सन्मान’ असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला, “खेळाडू असताना अशा भूमिकेसाठी निवड होणे अभूतपूर्व आहे. माझ्यासाठी हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. गेल्या वर्षी आम्ही जे साध्य केले, त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भारताकडे पुन्हा एक मजबूत संघ आहे, अशी आशा आहे.” त्याच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती, ज्यामुळे तो दोन ICC ट्रॉफी जिंकणारा भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने प्रभावी कामगिरी केली आहे. 4231 धावांसह तो भारतासाठी सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याचा स्ट्राइक रेट आणि मोठी खेळी खेचून देण्याची क्षमता भारतीय संघासाठी नेहमीच फायदेशीर ठरली आहे.

टी20 विश्वचषक 2026 साठी जाहीर झालेल्या गटांवरही रोहितने भाष्य केले. भारताला ग्रुप-ए मध्ये पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलॅण्डसोबत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना 15 फेब्रुवारीला रंगणार असून तो आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. गटाविषयी बोलताना रोहित म्हणाला, 'आमच्या गटात कोणत्याही संघाला हलक्यात घेता येत नाही. प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल आणि पहिल्याच चेंडूपासून तयारीत उतरावे लागेल.'

रोहितने जागतिक क्रिकेटच्या विस्ताराबद्दलही आनंद व्यक्त केला. विशेषतः इटलीसारख्या नव्या देशांचा समावेश झाल्याचे तो स्वागत करीत म्हणाला की, आगामी काळात युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील आणखी संघ स्पर्धेत दिसतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2026: “प्रत्येक Final अहमदाबादलाच का?” 'T20 World Cup' निर्णयावरून आदित्य ठाकरे संतापले

भारतामध्ये रोहितची ओळख एक धडाडीचा फलंदाज आणि शांत नेतृत्व करणारा कर्णधार अशी आहे. आता ICC ने त्याच्यावर सोपवलेल्या ब्रँड अॅम्बेसेडरच्या भूमिकेमुळे त्याची लोकप्रियता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रतिष्ठा आणखी बळकट होणार आहे.

2026 मध्ये होणारा टी20 वर्ल्ड कप हा रोहितसाठी मैदानाबाहेरून भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी ठरणार आहे. क्रिकेटप्रेमींना आता त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल उत्सुकता लागली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number