Rohit Sharma: ‘मुंबईमध्ये राहतो, मराठी तर येणारच…’ रोहित शर्माच्या हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत रंगल्या दिलखुलास गप्पा

रोहित शर्माने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेत मराठीत संवाद साधला.

Rohit Sharma: ‘मुंबईमध्ये राहतो, मराठी तर येणारच…’ रोहित शर्माच्या हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत रंगल्या दिलखुलास गप्पा

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण त्याची फलंदाजी नव्हे तर त्याचा साधेपणा आणि मराठी भाषेबद्दलचा आदर आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची त्याने नुकतीच भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ अभिनेत्री नम्रता संभेराव हिने समाजमाध्यमांवर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये नम्रता संभेरावसोबत प्रसाद खांडेकर आणि ओंकार राऊत देखील दिसत आहेत. कलाकारांशी संवाद साधताना रोहित शर्मा अगदी मोकळेपणाने गप्पा मारताना दिसतो. नम्रता संभेराव हिने रोहितला सांगितले की, “आम्ही तुमचे मराठीत बोलतानाचे व्हिडिओ पाहतो.” त्यावर रोहितने हसत उत्तर दिले, “मुंबईत राहतो, मराठी तर येणारच!” त्याच्या या साध्या आणि मनमोकळ्या उत्तराने उपस्थित कलाकारांसह चाहत्यांचीही मने जिंकली.

रोहितच्या या प्रतिक्रियेवर समाजमाध्यमांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या मराठीप्रेमाचे स्वागत करत अभिमान व्यक्त केला आहे. मुंबईत राहणारा आणि महाराष्ट्राशी जवळचा संबंध असलेला रोहित मराठी भाषेला मान देतो, हे पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

दरम्यान, सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेसाठी रोहित शर्मा विशेष प्रतिनिधी म्हणून जोडला गेला आहे. रविवारी भारत-पाकिस्तान सामना कोलंबो येथे पार पडला. त्या सामन्यासाठी रोहित कोलंबोला गेला होता. त्यानंतर तो मुंबईत परतला आणि त्याच वेळी हास्यजत्रेच्या कलाकारांची भेट घेतली.

रोहित शर्माने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय वीस षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो आता केवळ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर तो मैदानात उतरलेला नाही. आता मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारतीय प्रीमियर स्पर्धेत तो मुंबई संघाकडून पुन्हा मैदानात उतरणार आहे. त्यासाठी तो लवकरच सरावालाही सुरुवात करणार असल्याची माहिती आहे.

क्रिकेटमधील मोठे यश, शांत स्वभाव आणि आपल्या मातृभूमीच्या भाषेबद्दलचा आदर या सर्व गोष्टींमुळे रोहित शर्मा चाहत्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण करताना दिसतो. मैदानाबाहेरही तो तितकाच आपुलकीने वागतो, याची प्रचिती या भेटीतून पुन्हा एकदा आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number