आईपीएल 2026 मधील 20 व्या सामन्यात आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात आरसीबीने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी धुव्वा उडवला आहे. आरसीबीने दिलेल्या 241 धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 5 बाद 222 धावांपर्यंत पोहचू शकला. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 च्या हंगामात पहिला सामना जिंकून आपला 14 वर्षांचा वनवास संपवला, मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सची घडी पूर्णपणे विस्कटून गेल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात पहिला सामना सोडला तर मुंबई इंडियन्सने लागोपाठ तीन पराभव पचवले आहेत. इशातच मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
एकीकडे संघाला उतरती कळा लागली असताना मुंबई इंडियन्स संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा त्याचा पुढचा सामना खेळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काल म्हणजेच 12 एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध सामना खेळताना रोहित शर्माला पायाला दुखापत जाणवली ज्यामुळे फलंदाजी करताना त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. आधी त्याला ही दुखापत हलकी वाटली, मात्र त्याची दुखापत इतकी गंभीर झाली आहे की, त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा- Mumbai Indians Downfall | मुंबई इंडियन्सचं चुकतंय तरी काय ? का लागली संघाला उतरती कळा ?
नेमकं काय झाल?
वानखेडे स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळत असताना पाचव्या ओव्हरला आरसीबीकडून कृणाल पांड्या मैदानात आला होता. त्यावेळी एक चेंडूवर धाव घेताना रोहित शर्माला पायाला दुखापत जाणवली. मात्र तरी देखील तो मैदानात खेळत होता. सहाव्या ओव्हरमध्ये पुन्हा त्याला तसाच त्रास होऊ लागला. त्यामुळे फिजिओने त्याची तपासणी केली असता हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे त्याला रिटायर हर्ट होत माघारी फिरण्याचे आदेश दिले असं सांगण्यात आलं. दरम्यान यासंदर्भात मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतेच अपडेट दिले गेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला रुग्णालयात जाऊन आपल्या हॅमस्ट्रिंगचं स्कॅनिंग करावं लागणार असून डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनुसार त्याला पुढच्या सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. अशातच रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे संघाच टेन्शन वाढलं आहे.