Vaibhav Suryavanshi: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आज एका नव्या सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमधील ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या T-20 सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची (Debut) संधी मिळाली आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनुभवी संजू सॅमसनच्या जागी वैभवला भारतीय संघात स्थान दिले. या सामन्यात युवा खेळाडू तिलक वर्माने वैभवला त्याची पहिली आंतरराष्ट्रीय कॅप प्रदान केली. मैदान उतरताच वैभवने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा तब्बल 37 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे.
अवघ्या 15 वर्षे 99 व्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल
भारतासाठी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी हा आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या अवघ्या 15 वर्षे 99 व्या दिवशी हा बहुमान मिळवला. यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वर्ष 1989 मध्ये वयाच्या 16 वर्षे 205 व्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. वैभवने सचिनचा हा प्रदीर्घ काळ अबाधित असलेला विक्रम मागे टाकला आहे. आयर्लंड मालिकेपासूनच जगभरातील क्रिकेट चाहते या युवा खेळाडूच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत होते.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे सर्वात तरुण टॉप 6 खेळाडू:
वैभव सूर्यवंशी: 15 वर्षे 99 दिवस (विरुद्ध इंग्लंड, 2026)
सचिन तेंडुलकर: 16 वर्षे 205 दिवस (विरुद्ध पाकिस्तान, 1889)
पियुष चावला: 17 वर्षे 75 दिवस (विरुद्ध इंग्लंड, 2006)
एल. शिवरामकृष्णन: 17 वर्षे 118 दिवस (विरुद्ध वेस्ट इंडिज, 1983)
पार्थिव पटेल: 17 वर्षे 152 दिवस (विरुद्ध इंग्लंड, 2002)
मनिंदर सिंग: 17 वर्षे 193 दिवस (विरुद्ध पाकिस्तान, 1982)
IPL 2026 मध्ये 'ऑरेंज कॅप' जिंकून घेतली संघात एन्ट्री
बिहारमधून येणारा वैभव सूर्यवंशी सध्या अत्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या IPL 2026 च्या हंगामात आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालत एकूण 776 धावा कुटल्या होत्या आणि 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले होते. याशिवाय, अंडर-19 (19-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावांची तुफानी खेळी साकारली होती. याच सातत्यपूर्ण आणि स्फोटक कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले.
4 जुलै रोजी वैभवच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात
गेल्या आठवड्यापासून क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर केवळ वैभव सूर्यवंशीच्या नावाचीच चर्चा सुरू होती. भारतीय संघाचा युके (UK) दौरा 26 जून रोजी सुरू झाला होता, परंतु आयर्लंडविरुद्धचे 2 सामने किंवा इंग्लंडविरुद्धचा पहिला T-20 सामना यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. अखेरीस, 4 जुलै रोजी मँचेस्टरच्या मैदानावर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण साकार झाले असून, आगामी सामन्यांमध्येही तो आपल्या बॅटने उत्कृष्ट कामगिरी करेल अशी अशा चाहत्यांना आहे.