काल 28 फेब्रुवरी 2026 रोजी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. दरम्यान पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 213 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेनं 207 धावा केल्या. यावेळी पाकिस्तानला फक्त 5 धावांनी विजय मिळवता आला मात्र त्यांना 65 धावांच्या फरकाने जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानचा प्रवास संपला. साहिबजादा फरहानचा अपवाद वगळता आमचे संपूर्ण बॅटिंग युनिट अपयशी ठरलंय. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. मॅचनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्याच्या कामगिरीवर प्रश्न विचारत सलमानची इज्जतच काढली आहे.
हेही वाचा- ICC T20 World Cup 2026: विश्वचषकावर युद्धाचे सावट, इराणवरील हल्ल्यानंतर खेळाडूंच्या परतीचा मार्ग खडतर; ICC चा 'प्लॅन-बी' काय?
यावेळी एका पत्रकाराने विचारले की, "तुझी कामगिरी खराब राहिली, तू स्वतः कप्तानी सोडणार की बोर्ड तुला काढून टाकेल?" यावर सलमान आगा म्हणाला की, "यावर जो काही निर्णय होईल तो भावनिक विचार करून होईल.. दोन ते तीन दिवस थोडा वेळ घेऊ त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा ते घेऊ.. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये मी खूप चांगली बॅटिंग केली होती. मात्र यावेळेस वर्ल्डकपमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाही. जी कामगिरी संघाला अपेक्षित होती ती मी करू शकलो नाही, ज्यामुळे मिडल ऑर्डरवर दबाव निर्माण झाला आणि टीमला पराभवाचा सामना करावा लागला." पत्रकारासोबत बोलताना सलमान शांतपणे हसून उत्तर देत होता. तसेच त्याने आपली चूक देखील मान्य केली.
विश्वचषकावर युद्धाचे सावट
अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती चिघळली असून, याचा थेट फटका भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या ICC पुरुष टी-२० विश्वचषक 2026 ला बसला आहे. स्पर्धेत सहभागी असलेले खेळाडू, अधिकारी आणि प्रसारकांचे परतीचे प्रवास धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सर्व भागधारकांचा प्रवास, रसद आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी व्यापक 'आकस्मिक योजना' (Contingency Plans) राबवत असल्याचे शनिवारी स्पष्ट केले आहे.