Sanju Samson: टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करणाऱ्या भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध 97 धावांची वादळी खेळी करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा स्टार फलंदाज संजू सॅमसन आता आयसीसीच्या (ICC) रडारवर आला आहे. सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे संजूवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामुळे भारतीय गोटात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर संजू सॅमसन प्रचंड भावूक झाला होता. विजयाचा जल्लोष साजरा करताना त्याने रागाच्या किंवा अतिउत्साहाच्या भरात आपले हेल्मेट हवेत भिरकावले. आयसीसीच्या नियमांनुसार, मैदानावरील क्रिकेट साहित्याचा अशा प्रकारे अनादर करणे किंवा ते फेकणे हे आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते. संजूची ही कृती 'धोकादायक वर्तन' या श्रेणीत मोडू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे.
आयसीसीचा 'लेव्हल 1' चा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाडूने खेळाच्या साहित्याचा (Equipment) गैरवापर केल्यास तो 'लेव्हल 1' चा गुन्हा मानला जातो. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मॅच रेफरींकडे सोपवण्यात आला असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे. या गुन्ह्यासाठी संजूच्या मॅच फीमधून 25 ते 50 टक्क्यांपर्यंत कपात केली जाऊ शकते किंवा त्याच्या खात्यात 1 ते 2 डिमेरिट पॉईंट्स जोडले जाऊ शकतात. अत्यंत कमी गंभीर स्वरूप असल्यास केवळ अधिकृत ताकीद देऊन त्याला सोडले जाण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा - PCB Fine: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खेळाडूंवर मोठी कारवाई; 'या' कारणामुळे बाबर, शाहीन अन् सलमानला 50 लाखांचा दंड
इंग्लंडविरुद्धच्या महामुकाबल्यावर परिणाम होणार?
येत्या 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. जर संजूवर केवळ दंडात्मक कारवाई झाली, तर त्याच्या खेळण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अशा प्रकारच्या वादात नाव आल्यामुळे खेळाडूच्या मानसिकतेवर आणि संघाच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो. आता सर्वांचे लक्ष मॅच रेफरींच्या निर्णयाकडे लागले आहे.