Asian Games 2026: 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना 14-14 तास ताटकळत ठेवलं; राहण्यासह जेवणाची गैरसोय

या दीर्घ प्रतीक्षेच्या काळात खेळाडूंना आवश्यक सुविधा आणि वेळेवर अन्नापासूनही वंचित राहावे लागल्याचे समोर आले आहे.

Asian Games 2026: 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना 14-14 तास ताटकळत ठेवलं; राहण्यासह जेवणाची गैरसोय

Asian Games 2026:  जपानमधील नागोया येथे आयोजित 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी (Asian Games 2026) भारतीय खेळाडूंना राहण्याच्या व्यवस्थेबाबत मोठ्या गोंधळाचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, वैध ओळखपत्र असूनही अनेक भारतीय खेळाडूंना त्यांच्या खोल्या मिळण्यासाठी 12 ते 14 तासांहून अधिक काळ ताटकळत राहावे लागले. या दीर्घ प्रतीक्षेच्या काळात खेळाडूंना आवश्यक सुविधा आणि वेळेवर अन्नापासूनही वंचित राहावे लागल्याचे समोर आले आहे. राहण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्रूझ शिपवर (Cruise Ship) पोहोचल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला.

वुशू आणि रोइंग संघातील खेळाडूंची मोठी कोंडी 

सात खेळाडू आणि 2 प्रशिक्षक असलेला भारतीय वुशू संघ नागोया येथे पोहोचल्यानंतर नोंदणीच्या यादीतून एका खेळाडूचे आणि 2 प्रशिक्षकांचे नाव वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय भारतीय रोइंग संघातील (Rowing Team) खेळाडूंना सकाळी 9:00 वाजता (JST) क्रूझवर पोहोचूनही रात्री 8:30 वाजेपर्यंत खोल्या मिळाल्या नव्हत्या. एमएमए (MMA) खेळाडू वरुण सन्याल याने सोशल मीडियावर या परिस्थितीला दुजोरा देत म्हटले की, “मी स्वतः 7 तासांपासून वाट पाहत असून हा कालावधी अजूनही वाढत आहे.” आयोजकांकडून खेळाडूंच्या संख्येचा अंदाज लावण्यात झालेल्या चुकीमुळे ही गंभीर समस्या निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा –  Prithvi Shaw Breakup: क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी; 6 महिन्यांतच मोडला पृथ्वी शॉ अन् अभिनेत्री आकृती अग्रवालचा साखरपुडा

खोल्यांची कमतरता अन् ‘शेअरिंग’चा दबाव; इतर देशांच्या संघांनाही फटका

क्रूझ जहाजावर भारतीय खेळाडूंसाठी सुरुवातीला निश्चित केलेल्या खोल्यांपेक्षा प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे ज्यांना खोल्या मिळाल्या, त्यांनाही इतर खेळाडूंसोबत खोल्या सामायिक करण्यास सांगण्यात आले. भारतीय नेमबाजांसाठी आरक्षित असलेली निवास व्यवस्था इतर देशांच्या संघांना दिल्याने त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवावे लागले. हॉटेलच्या अभावामुळे फिलिपिन्सच्या काही अधिकाऱ्यांना ‘एअरबीएनबी’ मध्ये राहावे लागले, तर दक्षिण कोरियाच्या संघाने कंटेनर-शैलीतील खोल्यांच्या लहान आकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडून समस्येचे निरसन

दरम्यान, या गोंधळानंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खेळाडूंना इटालियन क्रूझ शिपवर खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतीय संघाचे ‘डेप्युटी शेफ द मिशन’ अचंता शरथ कमल यांनी सर्व खेळाडूंनी चेक-इन करण्यास सुरुवात केली असून सध्या कोणतीही मोठी अडचण नसल्याचे स्पष्ट केले. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 501 भारतीय खेळाडू आणि 265 अधिकारी सहभागी होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number