Indian Cricketer Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि ‘3D प्लेअर’ म्हणून ओळखला जाणारा विजय शंकर (Vijay Shankar) याने आज अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विजय शंकरने स्पष्ट केले की, तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट या दोन्ही प्रकारांतून निवृत्त होत आहे. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विजय शंकर 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघाचाही सदस्य होता.
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
निवृत्तीची घोषणा करताना विजय शंकरने आपल्या भावनिक प्रवासाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. “क्रिकेट हेच माझे आयुष्य राहिले आहे. वयाच्या 10 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि गेली 25 वर्षे या खेळाने मला खूप काही दिले. प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असलेल्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे,” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. पुढे तो म्हणाला की, क्रिकेटमधील नव्या संधी शोधण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असून, देशासाठी खेळणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव राहिला आहे. यावेळी विजय शंकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, फिजिओ आणि आपल्या क्रिकेट प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभारही मानले. त्याच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विजय शंकरची कारकीर्द
विजय शंकरची कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली राहिली. 2019 च्या विश्वचषकासाठी त्याची निवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. तत्कालीन मुख्य निवडकर्ता एम.एस.के. प्रसाद यांनी त्याला “3D प्लेअर” म्हटले होते, कारण तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत योगदान देऊ शकत होता. पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत लक्ष वेधून घेतले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजय शंकरने 12 एकदिवसीय सामने खेळताना 31.85 च्या सरासरीने 223 धावा केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. तसेच 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने 101 धावा आणि 5 विकेट्स मिळवल्या. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले. एकूण 78 आयपीएल सामन्यांत त्याने 1,233 धावा केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या.
?? pic.twitter.com/d7yxU1L70s — Vijay Shankar (@vijayshankar260) May 22, 2026
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय शंकरने तमिळनाडू क्रिकेट संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 77 सामने खेळताना 46.73 च्या सरासरीने 4,253 धावा केल्या, ज्यात 13 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाज म्हणूनही त्याने 43 विकेट्स घेत आपल्या अष्टपैलू क्षमतेची छाप सोडली.