Palash Muchhal Mother on Wedding Postpone :पलाश मुच्छल सांगलीतून मुंबईला परतला; आईने खुलासा केला, म्हणाल्या ‘लग्न पुढे ढकलल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या…’

स्मृती आणि पलाशच्या लग्नावर पलाशच्या आईची प्रतिक्रिया समोर.

Palash Muchhal Mother on Wedding Postpone :पलाश मुच्छल सांगलीतून मुंबईला परतला; आईने खुलासा केला, म्हणाल्या ‘लग्न पुढे ढकलल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या…’

Palash Muchhal Mother on Wedding Postpone:टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नसोहळ्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. दोघांचे लग्न काही दिवसांतच पार पडणार होते. मात्र अचानक समोर आलेल्या आरोग्याशी संबंधित घटनांमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. लग्न पुढे ढकलण्याच्या या निर्णयामागे नेमकं कारण काय? याबद्दल आता पलाशच्या आई अमिता मुच्छल यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितलं आहे.

स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली, पलाशने घेतला तत्काळ निर्णय

काही दिवसांपूर्वी स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक अस्वस्थता जाणवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या अतिशय जवळचा असल्याची माहितीही समोर आली आहे. अमिता मुच्छल म्हणतात, “स्मृतीपेक्षा पलाश कधी कधी तिच्या वडिलांना अधिक मानतो. त्यांच्या तब्येतीची माहिती मिळताच त्याने पहिल्यांदा लग्न पुढे ढकलावे लागेल असे ठामपणे सांगितले.”

स्मृतीच्या वडिलांची प्रकृती सुधारत असली तरी डॉक्टरांनी त्यांना अजून काही दिवस देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

नवरदेवाची प्रकृतीही ढासळली

लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश स्वतः मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाला होता. कुटुंबाच्या सांगण्यानुसार तो सतत रडत होता, ताण वाढत होता आणि त्याचा परिणाम थेट आरोग्यावर झाला. अमिता मुच्छल सांगतात, “हळद लागलेली असल्यामुळे आम्ही त्याला घराबाहेर जाऊ देत नव्हतो. त्याच अवस्थेत तो वारंवार भावनांनी व्याकूळ होत होता. ताण वाढत गेला आणि अचानक त्याची तब्येत खालावली.”

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल चार तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. ईसीजी, रक्त चाचण्या आणि इतर तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी पलाशची प्रकृती आता ठीक असल्याचं सांगितलं. मात्र भावनिक तणावामुळे विश्रांतीची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या पलाशला मुंबईत आणून पूर्ण विश्रांती देण्यात येत आहे.

दोन्ही कुटुंबांवर मानसिक धक्का, सावरायला वेळ लागणार

अचानक घडलेल्या या घटनांमुळे स्मृती आणि पलाशच्या दोन्ही कुटुंबांवर धक्का बसला आहे. एका बाजूला स्मृतीचे वडील रुग्णालयात, तर दुसऱ्या बाजूला पलाशची तब्येत बिघडल्यामुळे दोन्ही कुटुंब सावरत आहेत.

डॉ. नमन शाह यांच्या माहितीनुसार, “स्मृतींच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे, पण बीपी वाढल्यामुळे अजून काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे.”

लग्नाची नवीन तारीख कधी?

सध्या तरी लग्नाबाबतची नवीन तारीख जाहीर झालेली नाही. मात्र दोन्ही कुटुंबं सांगत आहेत की, श्रीनिवास मानधना पूर्णपणे बरे होतील, पलाशची तब्येत स्थिर होईल आणि मानसिक ताण कमी झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल.

आता चाहत्यांची नजर स्मृती आणि पलाशच्या पुढच्या अपडेटकडे आहे. दोघांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या नव्या विवाहमुहूर्ताची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number