Suryakumar Yadav : आगामी T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने विजयाची मोहोर उमटवली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 48 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार सूर्याने अवघ्या 22 चेंडूत 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
विराट-रोहितला मागे टाकत सूर्याचा ऐतिहासिक विक्रम
या सामन्यात 32 धावांची खेळी करताना सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमध्ये 9,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या दिग्गजांच्या नावावर हा विक्रम होता, मात्र सूर्याने या सर्वांना मागे सारत नवा इतिहास रचला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी चेंडूंमध्ये हा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्या आता दुसऱ्या स्थानी पोहोचला असून त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.
आकडेवारी काय सांगते?
T20 क्रिकेटमध्ये वेगवान धावा करण्याच्या बाबतीत सूर्याने जगभरातील फलंदाजांना कडवी झुंज दिली आहे:
आंद्रे रसेल: 5,321 चेंडू (जागतिक स्तरावर प्रथम)
सूर्याकुमार यादव: 5,911 चेंडू (भारतात प्रथम, जगात दुसरा)
ग्लेन मॅक्सवेल: 5,915 चेंडू (जागतिक स्तरावर तिसरा)
हेही वाचा - Ind Vs NZ T20: अभिषेक-रिंकूच्या फटकेबाजीमध्ये किवी उद्ध्वस्त; भारताचा पहिल्याच टी-20 मध्ये 'विराट' विजय
विजयानंतर आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, "मी मैदानावर उतरलो तेव्हा परिस्थिती आव्हानात्मक होती, पण मला माझा नैसर्गिक खेळ खेळताना आनंद झाला. गेल्या 2 ते 3 आठवड्यांपासून मी नेटमध्ये सराव करताना चेंडू चांगल्या प्रकारे मिडल करत होतो. या सामन्यात मी जे काही फटके खेळले, तो सर्व माझ्या कठोर सरावाचा परिणाम आहे. विश्वचषकापूर्वी सराव सामन्यांचा मला खूप फायदा झाला असून माझा आत्मविश्वास उंचावला आहे."