IND vs PAK T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठ्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी मात करत आर. प्रेमदासा स्टेडियमवर तिरंगा फडकवला आहे. भारताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने अगदी कमी धावांमध्ये डाव आटोपला. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला आठव्यांदा हरवून टीम इंडियाने शानदार विजयासह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 18 षटकांत फक्त 114 धावाच करता आल्या.
इशान किशनचे वादळी 77 आणि रिंकूचा फिनिशिंग टच
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. मात्र, इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची जबरदस्त खेळी केली. यामध्ये त्याने अनेक खणखणीत चौकार आणि षटकार लगावले. डावाच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंग (4 चेंडूत 11) आणि शिवम दुबे यांनी शाहीन आफ्रिदीला 16 धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने 175/7 ही पाकिस्तानविरुद्धची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा: बुमराह-हार्दिकने कंबरडे मोडले
176 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अतिशय भीषण झाली. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात साहिबजादा फरहानला शून्यावर बाद करत 'मेडन ओव्हर' टाकली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने सॅम अयुब आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांना माघारी धाडून पाकिस्तानची अवस्था 3 बाद 14 अशी केली. स्टार फलंदाज बाबर आझम देखील अक्षर पटेलच्या फिरकीवर 5 धावा करून बाद झाला. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा संघ कधीच सामन्यात पुनरागमन करू शकला नाही.
फिरकीची जादू: कुलदीप आणि तिलकची साथ
मध्यंतराच्या षटकांमध्ये कुलदीप यादवने आपल्या फिरकीवर मोहम्मद नवाजला बाद केले, तर तिलक वर्माने पहिल्याच चेंडूवर शादाब खानची विकेट घेत पाकिस्तानच्या आशा संपुष्टात आणल्या. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनीही टिच्चून गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला. पाकिस्तानचे फलंदाज केवळ 105 धावांत तंबूत परतले आणि भारताने एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.