India vs Australia Women 2026: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, टी-20 मालिकेत विजयी सलामी दिल्यानंतर संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेली शक्तिशाली फलंदाज प्रतिका रावल तब्बल 4 महिन्यांनंतर संघात परतली आहे. आगामी एकदिवसीय मालिकेसाठी तिचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून, तिच्या पुनरागमनामुळे भारताची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे.
दुखापतीवर मात आणि संघात पुनरागमन
प्रतिका रावलला 26 ऑक्टोबर 2025 रोजी बांगलादेशविरुद्धच्या ICC महिला विश्वचषक 2026 च्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिला प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर राहावे लागले. बेंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि वैद्यकीय चाचण्यांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त ठरल्यानंतर, निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी तिची निवड केली आहे.
प्रतिकाची आतापर्यंतची कामगिरी
डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या प्रतिकाने अत्यंत कमी वेळात आपली छाप पाडली आहे. तिने आतापर्यंत 24 एकदिवसीय सामन्यांच्या 23 डावांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने एकूण 1110 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तिची ही खेळी भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा - Match-Day Economy: भारत-पाक सामन्याने मोडले रेकॉर्ड; जाहिरातदारांनी 10 सेकंदासाठी मोजले लाखो रुपये
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे पुढील वेळापत्रक
भारतीय संघाने 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. मालिकेतील दुसरा सामना 19 फेब्रुवारी रोजी कॅनबेरा येथे, तर तिसरा सामना 21 फेब्रुवारी रोजी ॲडलेड येथे खेळवला जाईल. यानंतर 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल, ज्यामध्ये प्रतिका रावल ॲक्शनमध्ये दिसणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल आणि प्रतीका रावल.