Deepti Sharma: कसोटी, वनडे अन् आता T20… दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू कायम; ‘ही’ कामगिरी करत दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत मिळवलं स्थान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी 3-1 अशी आघाडी घेतली असली, तरी चौथ्या सामन्यात भारताने 14 धावांनी विजय मिळवून दिमाखदार पुनरागमन केले.

Deepti Sharma: कसोटी, वनडे अन् आता T20… दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू कायम; ‘ही’ कामगिरी करत दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत मिळवलं स्थान

Deepti Sharma: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात आपल्या अष्टपैलू खेळाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी 3-1 अशी आघाडी घेतली असली, तरी चौथ्या सामन्यात भारताने 14 धावांनी विजय मिळवून दिमाखदार पुनरागमन केले. या विजयाची शिल्पकार ठरली ती दीप्ती शर्मा, जिने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली.

तिन्ही फॉरमॅटमध्ये 'फायफर' घेणारी चौथी खेळाडू
चौथ्या T20 सामन्यात दीप्तीने प्रथम फलंदाजी करताना 26 चेंडूंत 36 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना तिने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत 5 बळी टिपले. या कामगिरीसह दीप्ती शर्मा आता महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात खेळाच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय आणि T20) पाच बळी घेणारी जगातील चौथी खेळाडू ठरली आहे. तिने भारताची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी, इंग्लंडची जेनी गन आणि ऑस्ट्रेलियाची ॲशले गार्डनर यांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

दीप्तीचा 'फिरकी' फास; दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला
भारताने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड (18) हिला क्रांती गौडने बाद केल्यानंतर दीप्तीने मोर्चा सांभाळला. तिने सेट झालेल्या सुने लुस (40) आणि ॲनेके बॉश (9) यांना त्रिफळाचीत करून यजमानांना मोठे धक्के दिले. त्यानंतर मधल्या आणि खालच्या फळीतील कायला रेनेके (21), अयाबोंगा खाका (1) आणि तुमी सेखुखुने (4) यांनाही बाद करून भारताचा विजय निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 9 बाद 171 धावांपर्यंतच मर्यादित राहिला.

हेही वाचा – IPL 2026: आयुष म्हात्रेनंतर आता हा शतकवीर…; राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; चाहते चिंतेत

जेमिमाह आणि रिचाची फलंदाजीतील फटकेबाजी
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात संथ झाली होती. सलामीवीर शफाली वर्मा (9) आणि अनुष्का शर्मा (27) लवकर बाद झाल्या. मात्र, जेमिमाह रॉड्रिग्जने (43) आक्रमक फलंदाजी करत डावाला आकार दिला. तिला कर्णधार हरमनप्रीत कौर (22) आणि दीप्ती शर्माची चांगली साथ लाभली. डावाच्या शेवटच्या टप्प्यात रिचा घोषने (34) वेगवान धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने 20 षटकांत 5 बाद 185 धावांचा डोंगर उभा केला. या अष्टपैलू कामगिरीमुळे दीप्ती शर्मा सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number