विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव मांडताना ज्या काही गंभीर चुका केल्या, त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून सडकून टीका सुरू आहे. त्यांनी ज्या पद्धतीने शोकप्रस्ताव वाचला यामुळे मराठीचीच अब्रू निघाली, इतकेच नव्हे तर लक्तरे वेशीवर टांगली गेली, अशीच भावना मराठी जनांमधून उमटली. एकीकडे महाराष्ट्रात मराठी भाषेवरून नवनवीन वाद सुरु असताना दुसरीकडे जागतिक स्थारावर प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवून टाकणाऱ्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. जगातील सर्वात लोकप्रिय अशा ‘फिफा वर्ल्डकप’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर अस्सल मराठी भाषेचा डंका पाहायला मिळत आहे.
सध्या भारतात क्रिकेटनंतर फुटबॉल हा खेळ प्रचंड लोकप्रिय असल्याचे पाहायले मिळत आहे. दरम्यान फिफाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार आणि किलियन एम्बाप्पे यांसारख्या जागतिक दर्जाच्या स्टार फुटबॉलपटूंच्या फोटोंवर “भावा…”, “नाद करायचा नाय”, “किंग इज बॅक” अशा गावरान आणि मराठी शब्दांत पोस्ट टाकली आहे.
सुरुवातीला या पोस्ट मॉर्फ केलेल्या वाटत होत्या मात्र पेजच्या नावापुढील ‘ब्लू टिक’ पाहिल्यावर अवघ्या काही तासांतच मराठी नेटकऱ्यांनी कमेंटबॉक्समध्ये आपली हजेरी लावली. एका अत्यंत अभूतपूर्व व अभिमानास्पद अशा या पोस्ट्सवर हजारो युजर्सनी कौतुकाचा पाऊस पाडला आहे. फिफाच्या डिजिटल टीमला अचूक माहिती आहे की, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये फुटबॉल प्रेमींचा खूप मोठा वर्ग आहे. जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर मराठी भाषेचा आदर केला जात आहे आणि तिला मानाचे स्थान दिले जात आहे. त्यामुळे फिफाचे प्रचंड कौतुक केले जात आहे.