Cricket Retirement 2025: भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याने 22 डिसेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमधील आपल्या चमकदार कामगिरीने त्याने चाहत्यांच्या मनात घर केले होते.
14 वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास
दरम्यान, 2012 मध्ये पदार्पण करणाऱ्या गौतमची कारकीर्द जवळपास 14 वर्षे चालली. कर्नाटक संघाचा तो एक अविभाज्य भाग होता. उत्तम फिरकी गोलंदाजी आणि खालच्या फळीत येऊन आक्रमक फलंदाजी करण्याची त्याची शैली प्रेक्षकांच्या विशेष आवडीची होती. त्याने आयपीएलमध्ये अनेक बड्या संघांचे प्रतिनिधित्व केले.
आयपीएलमधील 'तो' ऐतिहासिक विक्रम
2021 मध्ये कृष्णप्पा गौतम खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला जेव्हा चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याला तब्बल 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यावेळी तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड (ज्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही असा) खेळाडू ठरला होता. आपल्या 9 वर्षांच्या आयपीएल प्रवासात त्याने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि लखनऊ सुपर जायंट्स यांसारख्या बलाढ्य संघांसाठी आपली सेवा दिली.
गौतमची कारकीर्द
दरम्यान, कृष्णप्पा गौतमने 59 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात 224 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 68 लिस्ट ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 92 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब, एलजीसी, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. गौतमने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले, मात्र त्याला फार संधी मिळाल्या नाहीत. जुलै 2021 मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली त्याने श्रीलंकेविरुद्ध आपला एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामना खेळला. या सामन्यात त्याने 1 विकेट घेतली होती, मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळू शकले नाही.
भविष्यातील योजना गुलदस्त्यात
निवृत्ती जाहीर करताना गौतमने आपल्या भविष्यातील वाटचालीबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. तो प्रशिक्षक म्हणून दिसणार की कॉमेंट्री बॉक्समध्ये, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.