Wednesday, April 22, 2026 10:24:48 PM

Cricketer of The Year: 'या' खेळाडूला मिळणार वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान; तर माजी प्रशिक्षकाचाही होणार विशेष सन्मान

टी-20 विश्वचषकात स्थान न मिळूनही, इतर दोन फॉरमॅटमधील त्याच्या वर्चस्वामुळे त्याची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

cricketer of the year या खेळाडूला मिळणार वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान तर माजी प्रशिक्षकाचाही होणार विशेष सन्मान

Cricketer of The Year:  भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याच्यासाठी हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. जरी गिल टी-20 विश्वचषक 2026 च्या विजेत्या संघाचा भाग नसाला, तरी गेल्या वर्षातील त्याच्या सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरीची दखल बीसीसीआयने (BCCI) घेतली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात गिलला 'वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू' (Cricketer of the Year) म्हणून गौरविण्यात येणार आहे.

15 मार्चला रंगणार बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 15 मार्च रोजी बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 26 वर्षीय शुभमन गिलने गेल्या वर्षभरात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. टी-20 विश्वचषकात स्थान न मिळूनही, इतर दोन फॉरमॅटमधील त्याच्या वर्चस्वामुळे त्याची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

2025 मधील गिलच्या धावांची आकडेवारी 
शुभमन गिलसाठी गेल्या वर्षाचा हंगाम अत्यंत यशस्वी ठरला. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 49 च्या सरासरीने एकूण 1764 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 983 धावा केल्या, ज्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 754 धावा काढल्या. तथापी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 490 धावा केल्या असून चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात 188 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना त्याने 50 च्या सरासरीने 650 धावा कुटल्या होत्या. आता त्याचे लक्ष आयपीएल 2026 मध्ये अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यावर आहे.

हेही वाचा - Team India: टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया मैदानात कधी परतणार? पुढच्या सामन्याची तारीख आली समोर

राहुल द्रविड यांना 'जीवनगौरव' पुरस्कार
या सोहळ्याचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 'कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित केले जाणार आहे. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) सर्वोत्तम संघटनेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
 


सम्बन्धित सामग्री