Vaibhav Suryavanshi: भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अंगावर चढवण्याचे स्वप्न देशातील प्रत्येक उदयोन्मुख खेळाडू पाहत असतो. बिहारच्या अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी हा सुवर्णक्षण आता प्रत्यक्षात आला आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी या युवा फलंदाजाला जेव्हा पहिल्यांदाच टीम इंडियाची जर्सी देण्यात आली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बीसीसीआयने 23 जून रोजी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये वैभव पहिल्यांदाच भारताची निळी जर्सी परिधान करताना दिसत असून, हा क्षण त्याच्यासाठी इतका भावूक होता की त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दही सुचेनासे झाले होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बालपणीच्या स्वप्नांची पूर्तता
टीम इंडियाची जर्सी हातात आल्यानंतर वैभवने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला की, हा अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे. लहानपणी ज्या एका स्वप्नासाठी हातात बॅट धरली आणि मैदानावर घाम गाळण्यास सुरुवात केली, ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. हा माझ्या संपूर्ण क्रिकेट प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जर्सी पाहताच वैभवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला. अनेकदा आपण ज्या गोष्टीची कल्पनाही केलेली नसते, ती जेव्हा प्रत्यक्षात समोर येते तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही, तशीच काहीशी अवस्था वैभवची झाली होती.
Ladies & Gentlemen The moment the nation has been waiting for has arrived! Vaibhav Sooryavanshi in #TeamIndia jersey. Witness this incredibly special moment ❤️ pic.twitter.com/sUUytFMPVw — BCCI (@BCCI) June 23, 2026
थ्रोडाऊन स्पेशालिस्ट ‘रघू’च्या पाया पडून घेतला आशीर्वाद
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक अतिशय हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघाचे प्रसिद्ध ‘थ्रोडाऊन स्पेशालिस्ट’ राघवेंद्र (रघू) हे वैभवची जर्सी घेऊन त्याच्या हॉटेलच्या खोलीवर पोहोचले. खोलीचा दरवाजा उघडताच समोर रघू यांना पाहून वैभवने आदरपूर्वक थेट त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यानंतर त्याने जर्सीचा बॉक्स उघडून ती हातात घेतली आणि काही वेळ तो त्या जर्सीकडे एकटक पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यांतील चमक आणि ओठांवरचे हसू हे सांगण्यासाठी पुरेसे होते की, लहानपणापासून घेतलेल्या कष्टांचे आज चीज झाले आहे.
हेही वाचा – ICC Womens Cricket: मातृत्वानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक करणे होणार सोपे; ICC ची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीचे फळ
वैभव सूर्यवंशीने गेल्या काही काळापासून क्रिकेट जगतात आपल्या नावाची मोठी छाप पाडली आहे. सुमारे एका वर्षापूर्वी आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू बनला होता. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही धावांचा पाऊस पाडला. विशेषतः आयपीएल 2026 च्या हंगामात त्याने तब्बल 776 धावा कुटल्या, ज्यामध्ये विक्रमी 71 षटकारांचा समावेश होता. या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याने ‘ऑरेंज कॅप’वर आपले नाव कोरले होते. आयपीएलमधील याच उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली असून, आता आयर्लंड दौऱ्यावर या 15 वर्षीय स्टार फलंदाजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.