DY Patil T20 Cup: भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सध्या 2026 च्या टी-20 विश्वचषकात व्यस्त असताना, दुसरीकडे आगामी आयपीएल हंगामापूर्वी युवा खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत 14 वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळताना वैभवने भारतीय नौदलाच्या गोलंदाजांविरुद्ध केवळ 14 चेंडूत अर्धशतक झळकावून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
19 चेंडूत 63 धावा आणि 331 चा स्ट्राईक रेट
भारतीय नौदलाने दिलेल्या 220 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि यश धुल ही जोडी मैदानात उतरली. वैभवने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेत नौदलाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने आपल्या खेळीत एकूण 19 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार मारत 63 धावा कुटल्या. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 331.58 इतका प्रचंड होता. वैभवच्या या वादळी सुरुवातीमुळे डीवाय पाटील ब्लू संघाने 19.1 षटकांतच विजय मिळवला.
अर्जुन तेंडुलकरची नाबाद खेळी आणि संघाचा विजय
वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती खेळीनंतर अर्जुन तेंडुलकरनेही आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले. अर्जुनने केवळ 29 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी केली. अर्जुन शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिला आणि त्याने आपल्या संघाला विजयाची रेषा ओलांडून दिली. आगामी आयपीएल 2026 चा हंगाम वैभव आणि अर्जुन या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, या कामगिरीमुळे चाहत्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
हेही वाचा - T20 World Cup Super8: टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे निर्णायक सामना नक्की किती वाजता? जाणून घ्या चॅनेल आणि स्ट्रीमिंगचे सर्व डिटेल्स
आयपीएल 2026 मध्ये राहणार सर्वांची नजर
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. त्याने घरगुती स्पर्धेत केलेल्या या कामगिरीमुळे आयपीएलमधील फ्रँचायझींचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले आहे. आयपीएलचा 19 वा हंगाम लवकरच सुरू होणार असून, या युवा खेळाडूची बॅट तिथेही अशीच तळपणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.