IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2026 च्या मोसमाकडे क्रिकेट चाहते एका वेगळ्या नजरेने पाहत आहेत. हा मोसम केवळ धावांचा पाऊस पाडणारा नसेल, तर अनेक दिग्गजांचा मैदानातील शेवटचा प्रवास ठरण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंग धोनीसह क्रिकेट विश्वातील अशा 6 बड्या नावांची चर्चा सुरू आहे, जे या मोसमानंतर बॅट किंवा बॉल कायमचे बाजूला ठेवू शकतात.
1. महेंद्रसिंग धोनी
'कॅप्टन कूल' एमएस धोनी आणि सीएसके हे समीकरण आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. 44 व्या वर्षीही धोनी मैदानात असला तरी, यंदा चेन्नईने संजू सॅमसनला संघात स्थान देऊन भविष्यातील उत्तराधिकारी तयार केल्याचे संकेत दिले आहेत. 278 सामन्यांत 5,439 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या धोनीसाठी हा मोसम निरोपाचा ठरण्याची दाट शक्यता आहे.
2. अजिंक्य रहाणे (वय 37, कोलकाता नाईट रायडर्स)
केकेआरने यंदा रहाणेला नेतृत्वाची धुरा दिली असली, तरी 37 वर्षीय अजिंक्यसाठी हे वर्ष 'अग्निपरीक्षा' असेल. 5 हजारहून अधिक धावांचा अनुभव पाठीशी असला तरी, ढासळता फॉर्म आणि वाढते वय पाहता, या मोसमातील अपयश रहाणेच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकते.
3. सुनील नरेन (वय 37, कोलकाता नाईट रायडर्स)
गेल्या दशकापासून केकेआरचा कणा असलेला 'मिस्ट्री स्पिनर' सुनील नरेन आता 37 वर्षांचा झाला आहे. फिरकीसोबतच आक्रमक फलंदाजीने त्याने अनेक सामने जिंकवले, मात्र फिटनेसच्या वाढत्या समस्या आणि वयोमानानुसार कमी झालेली धार यामुळे नरेन यंदा शेवटचा मोसम खेळताना दिसेल.
4. मिचेल स्टार्क (वय 36, ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचा हा वेगवान गोलंदाज अजूनही घातक आहे, पण वर्कलोड मॅनेजमेंट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेले प्राधान्य यामुळे स्टार्क आयपीएलला रामराम ठोकू शकतो. 36 व्या वर्षी स्टार्क आपल्या प्रदीर्घ प्रवासाचा शेवट करण्यासाठी 2026 च्या मोसमाची निवड करण्याची चिन्हे आहेत.
5. इशांत शर्मा (वय 37, गुजरात टायटन्स)
गेल्या मोसमात गुजरातकडून खेळताना इशांतची महागडी गोलंदाजी चिंतेचा विषय ठरली होती. 11 पेक्षा जास्तच्या इकॉनॉमी रेटमुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 37 व्या वर्षी इशांतला आपली लय परत मिळवावी लागेल, अन्यथा त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे कायमचे बंद होऊ शकतात.
हेही वाचा - IPL 2026: RCB आणि KSCA ला हिरवा कंदिल; IPL 2026 चा सलामीचा सामना चिन्नास्वामीवरच रंगणार
6. मार्कस स्टॉयनिस (वय 36, पंजाब किंग्स)
पंजाब किंग्सने 11 कोटींची मोठी बोली लावून स्टॉयनिसवर विश्वास टाकला आहे. सामना फिरवण्याची क्षमता असलेला हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू सातत्याच्या अभावामुळे टीकेचा धनी ठरत आहे. 36 वर्षीय स्टॉयनिसला यंदा आपली किंमत सिद्ध करावी लागेल, अन्यथा पंजाबसह इतर संघही त्याच्याकडे पाठ फिरवू शकतात.