IPL Schedule Update: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता क्रिकेट विश्वालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि देशावरील ताण कमी करण्यासाठी आयपीएलच्या चालू हंगामाचे वेळापत्रक बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात व्यापार आणि उद्योग मंडळाने (CTI) केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे.
क्रीडामंत्र्यांना पत्र: ‘प्रवास टाळा, इंधन वाचवा’
CTI चे चेअरमन ब्रिजेश गोयल (Brijesh Goyal) यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, हवाई प्रवास कमी करण्यासाठी आयपीएलचे उर्वरित सामने काही ठराविक शहरांतच मर्यादित मैदानांवर खेळवावेत. एका सामन्यासाठी साधारण 50,000 प्रेक्षक येतात. प्रेक्षकांविना सामने खेळवल्यास वाहनांसाठी लागणाऱ्या हजारो लिटर पेट्रोल-डिझेलची बचत होईल. ज्याप्रमाणे कोरोना काळात बायो-बबलमध्ये मोजक्याच ठिकाणी स्पर्धा पार पडली, तसाच प्रयोग आताही करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
PHOTO | CTI Chairman Brijesh Goyal writes a letter to Union Sports Minister Mansukh Mandaviya, urging that the remaining matches of the Indian Premier League be held at limited venues and without spectators. pic.twitter.com/pgMjFYCZC6 — Press Trust of India (@PTI_News) May 17, 2026
हवाई प्रवासाचा इंधन खर्च (CTI चा अंदाज):
संघांच्या सततच्या हवाई प्रवासावर होणाऱ्या खर्चाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. Boeing 737 किंवा Airbus A320 सारखी चार्टर्ड विमाने तासाला 2400 ते 3000 लिटर इंधन वापरतात. साधारण दोन तासांच्या प्रवासात 5000 ते 6000 लिटर एव्हिएशन फ्युएल (ATF) खर्च होते. लांब पल्ल्याच्या प्रवासात हा आकडा 8000 लिटरपर्यंत जातो. प्रत्येक संघ सरासरी 10 वेळा हवाई प्रवास करतो. म्हणजेच एका संघाकडून साधारण 50,000 ते 70,000 लिटर इंधनाचा वापर होत आहे.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्येही इंधन बचतीसाठी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती गोयल यांनी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर बीसीसीआयला (BCCI) उरलेल्या सामन्यांचे स्थळ आणि प्रेक्षकांच्या एन्ट्रीबाबत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. सध्या 28 मार्चपासून सुरू झालेल्या या हंगामात सर्व संघ विविध शहरांमध्ये प्रवास करत आहेत. आता यावर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.