Women Cricket World Cup 2025: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताची दमदार सुरुवात; श्रीलंकेवर 59 धावांनी विजय

महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारताने गुवाहाटीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 59 धावांनी मात करून विजयी सुरुवात केली.

Women Cricket World Cup 2025: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताची दमदार सुरुवात; श्रीलंकेवर 59 धावांनी विजय

आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 47 षटकांचा सामना खेळविण्यात आला. डकवर्थ-लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, पण त्यांचा संघ 45.4 षटकांत 211 धावांवर गारद झाला.
 
भारताच्या विजयात अष्टपैलू दीप्ती शर्माचा मोठा वाटा होता. तिने केवळ नाबाद 53 धावांची खेळी केली नाही, तर तीन महत्त्वाचे बळीही घेतले. तिच्या या बहुमोल कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. तसेच अमनजोत कौरने 57 धावांची खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले, तर शेवटी स्नेह राणाने जलद 28 धावा करून स्कोर आव्हानात्मक बनवला.
 
भारतीय संघाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली होती. सलामीवीर स्मृती मंधाना कमी धावसंख्येवर बाद झाली. त्यानंतर प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनी डाव सावरला, परंतु मध्यक्रमात पुन्हा गडी गमावले गेले. 124 धावांवर सहा गडी गेल्यानंतर दीप्ती आणि अमनजोतने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताला 269 धावांपर्यंत नेले.
 
श्रीलंका संघाच्या फलंदाजीत कर्णधार चमारी अटापट्टूने 43 धावा करत सर्वाधिक योगदान दिले. तिच्यासोबत नीलाक्षी डिसिल्वा (35) आणि हर्षिता समरविक्रमा (29) यांनी थोडेसे प्रतिकार केले. मात्र उर्वरित फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकल्या नाहीत. इनोका रणावीरा यांनी चार बळी घेत भारताच्या फलंदाजीत अडथळा आणला, तरीही त्याचा श्रीलंकेला काही फायदा झाला नाही.
 
या विजयासह भारताने स्पर्धेत पहिली पायरी मजबूत केली असून संघाचे मनोबल उंचावले आहे. भारत आणि श्रीलंका हे या विश्वचषकाचे संयुक्त यजमान असून, गटातील पुढील सामने आणखी रोमहर्षक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number