दिल्लीचा पराभव करत मुंबईने पटकावलं WPL 2025 चे विजेतेपद
मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा फायनलमध्ये पराभव करत वूमन्स प्रीमियर लीग म्हणजे WPL २०२५ चे विजेतेपद पटकावले. मुंबईचे हे दुसरं विजेतेपद ठरले. तर सलग तीन वेळा फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दिल्लीचे पुन्हा एकदा विजेतेपदाच स्वप्न भंगलं आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या फायनल सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ धावांनी पराभव करत करंडकावर आपलं नाव कोरलं. तर दिल्लीला सलग तिसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
फायनल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावत १४९ धावांचा टप्पा गाठला. मुंबई इंडियन्सची सुरुवात काहीशी खराब झाली. पहिल्या दोन षटकांत संघाने केवळ ५ धावा केल्या. यश्तिका भाटिया (८ धावा) आणि हेली मॅथ्यूज (३ धावा) स्वस्तात माघारी परतल्यानंतर मुंबईचा संघ अडचणीत सापडला. तेव्हा हरमनप्रीत कौर आणि नॅटली स्किव्हर ब्रंट यांनी डाव सावरला. या दोघींनी ६२ चेंडूत ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
नॅटली स्किव्हर ब्रंटने २८ चेंडूत ३० धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला आणि ४४ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह ६६ धावा फटकावल्या. हरमनप्रीत वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. जी कमालिनीने १०, अमनजोत कौरने १४, तर संस्कृती गुप्ताने ८ धावा केल्या. दिल्लीकडून मेरिझॅन कॅप, जेस जोनासन आणि नल्लपुरेड्डी चराणी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अॅनाबेल सदरलँडने १ गडी बाद केला.
हेही वाचा - Virat Kohli : विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार? भविष्याचा प्लॅन उघड करत दिले निवृत्तीचे संकेत
मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ ९ विकेट्स गमावत केवळ १४१ धावा करू शकला. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. मेग लॅनिंग (१३), शफाली वर्मा (४), जेस जोनासन (१३), जेमिमा रॉड्रिग्ज (३०), एनाबेल सदरलँड (२), सारा ब्राईस (५) हे स्वस्तात बाद झाले. दिल्लीसाठी मेरिझॅन कॅपने अष्टपैलू खेळ करत २६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची खेळी केली. निक्की प्रसादनेही २५ धावा केल्या. पण नॅटली स्किव्हर ब्रंटने मेरिझॅन कॅपची विकेट घेत सामना मुंबईच्या बाजूने फिरवला.