‘काही लोक स्वतःच्याच मस्तीत…’; महायुतीत अंतर्गत वाद पेटला, श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर निशाणा

प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार श्वेता महाले यांनी नाव न घेता संजय गायकवाड यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.

‘काही लोक स्वतःच्याच मस्तीत…’; महायुतीत अंतर्गत वाद पेटला, श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर निशाणा
महायुतीत अंतर्गत वाद पेटला, श्वेता महालेंची संजय गायकवाडांवर टीका

बुलढाणा जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सुरू असलेला अंतर्गत राजकीय कलह आता समोर आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, गुरुवारी रात्री दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याची घटना घडली. या संपूर्ण प्रकारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार श्वेता महाले यांनी नाव न घेता संजय गायकवाड यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. महायुतीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्तम समन्वय असताना केवळ एका व्यक्तीच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण गढूळ होत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

‘पक्षश्रेष्ठींनाही जुमानत नाहीत’; वरिष्ठ नेत्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा

आमदार संजय गायकवाड यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांवर आणि वर्तनावर बोट ठेवत श्वेता महाले म्हणाल्या की, संबंधित आमदाराला त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही. काही लोक स्वतःलाच पक्षापेक्षा मोठे समजतात आणि स्वमस्तीत जगतात. अशा लोकांना आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा किंवा महायुतीच्या शिस्तीचा कोणताही आदर उरलेला नाही. आपणच सर्वात मोठे आहोत या अहंपणातून ते सतत महायुतीची प्रतिमा मलीन करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात, कारण धक्कादायक!

विद्युत पुरवठा खंडित करण्यावरून यापूर्वी पेटला होता वाद

चिखली आणि बुलढाणा मतदारसंघातील या दोन प्रमुख नेत्यांमधील वाद काही नवा नाही. यापूर्वी आमदार श्वेता महाले यांच्या पतीच्या वाढदिवस कार्यक्रमादरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामागे संजय गायकवाड यांचाच हात असल्याचा संशय व्यक्त करत महाले यांनी त्यांना समोरासमोर लढण्याचे खुले आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना गायकवाड यांनीही राजकीय वर्चस्व दाखवण्याची भाषा केली होती. आता कार्यकर्त्यांमधील थेट हाणामारीमुळे आणि श्वेता महाले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बुलढाण्यातील महायुतीचा हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number