Viral video: गावांमध्ये, शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास असतोच. तसेच, काही लोकांनी पाळलेल्या कुत्र्यांचा इतरांनाही त्रास होत असतो. कधी कधी पाळलेल्या कुत्र्याचा त्याच्या मालकालाही त्रास होऊ शकतो. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, त्यांना कुत्र्यांच्या जवळ जाऊ न देणे हाच एक सर्वोत्तम मार्ग. कुत्र्यांपासून दूर रहायला सांगूनही लहान मुले पालकांचा डोळा चुकवून कुत्र्यांशी खेळताना दिसतात. अशाच एका लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला आणि हा चिमुकला अगदी बालंबाल बचावला.
भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात.
हेही वाचा - VIDEO : पाण्यात उभं राहून मजेत फोटो काढत होता; तेवढ्यात पायाला काहीतरी लागलं.. बघतो तर काय.. हातात आली मगर..
भटक्या कुत्र्यांचे हल्ले लहान मुलांसाठी अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. अशाच पद्धतीने पाळीव कुत्र्याने जर अचानकपणे हल्ला केला, तर तोही जीवघेणा ठरू शकतो. अशाच एका कुत्र्यानं चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला करत त्याचे तोंडच एका बाजूने जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचा पूर्ण उघडलेला आक्राळ-विक्राळ जबडा, त्याचे भयंकर दात आणि त्यात जाणारा चिमुकल्याचा चेहरा पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील. कुत्र्याचे तीक्ष्ण अणकुचीदार दात या मुलाच्या गाल, डोळा, हनुवटी आणि तोंडात घुसण्यापासून थोडक्यात वाचले. कारण, कुत्रा बांधलेला होता. त्यामुळे त्याला तितक्या ताकदीने चावा घेता आला नाही. कुत्र्याच्या या कृतीने घाबरलेल्या चिमुकल्यानेही चटकन त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला. त्याही कारणाने तो थोडक्यात वाचला. तरीही, या मुलाच्या तोंडाला कुत्र्याचे काही दात लागलेले असण्याची शक्यता आहेच. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला कॅमेऱ्याला पोझ देताना कुत्र्याच्या तोंडाजवळ जाऊन त्याला एका हाताने कवेत घेतो. तेवढ्यात तो कुत्रा चिमुकल्याच्या थेट तोंडावरच हल्ला करतो. तो अक्षरश: चिमुकल्याच्या तोंडाचा लचका तोडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी हा चिमुकला कुत्र्याच्या या अचानक बदललेल्या मूडमुळे घाबरलेला दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना असे एकटे न सोडू नये, असाही सल्ला दिला आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच, सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर आणलेल्या पाळीव कुत्र्यांचाही लोकांना त्रास होतो. गाडीवरून जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर, काही लहान मुलांनी जीवही गमावलेला आहे. कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे.
हेही वाचा - बायकोनं गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं.. मग नवऱ्यानं काय केलं? पोहताही येत नसताना तलावात उडी मारली..! पाहा VIDEO
बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणारे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ benassi_educadorcanino नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे” तर आणखी एकानं, भयंकर प्रकार म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीने दर्शकांना असं विचारलंय की, आता तुम्हीच सांगा, यात चूक कुणाची आहे, मुलाची की, कुत्र्याची?
याशिवाय, ही पोस्ट लिहिणाऱ्याने कुत्र्यांच्या स्वभावाविषयी आणि मूडसविषयी माहिती दिली आहे. ती सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांना उपयुक्त ठरू शकते.
कुत्र्यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव वेगवेगळे असतात आणि काहींना मिठी मारल्यानंतर अस्वस्थ किंवा धोका वाटू शकतो. अस्वस्थतेची ही भावना नैसर्गिक प्रवृत्तीचा परिणाम असू शकते, कारण मिठीचा अर्थ त्या कुत्र्याकडून प्रतिबंधाचा एक प्रकार म्हणून समजला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या मनात चिंता किंवा ताण निर्माण होऊ शकतो.
कुत्र्याला अस्वस्थ वाटत असल्याची चिन्हे अशी आहेत:
1. डोळे मिटवणे: कुत्रा डोळ्यांचा संपर्क टाळू शकतो, जे सूचित करते की तो परिस्थितीतून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे.
2. डोक्याची हालचाल: तो डोके फिरवू शकतो किंवा थोडेसे बाजूला सरकू शकतो, जे त्याला अस्वस्थ असल्याचे दर्शवते.
3. कान मागे: कान खाली करणे हे अधीनता किंवा अस्वस्थता दर्शवू शकते.
4. जीभ बाहेर येणे: ओठ चाटणे किंवा जीभ हलवणे हे तणावाचे लक्षण असू शकते.
5. शेपटीचे टोक: पायांच्या मधे घातलेली शेपटी किंवा शेपटीचे टोक भीती किंवा चिंता दर्शवू शकते.
6. गुरगुरणे किंवा अस्वस्थपणे भुंकणे: हे आवाज कुत्र्याला धोका वाटत आहे आणि तो त्यावर प्रतिक्रिया देण्यास तयार असू शकतो, याचा स्पष्ट इशारा देतात.
जर कुत्रा खरोखर अस्वस्थ वाटत असेल, तर तो आक्रमकपणे प्रतिक्रिया देऊ शकतो, जसे की चावणे, विशेषतः जर परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसेल तर. परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून कुत्र्याच्या जवळ न जाणे उत्तम. पण त्यासाठी अस्वस्थतेची ही चिन्हे ओळखणे महत्त्वाचे आहे. अनावश्यकपणे आणि ओळख नसलेल्या कोणत्याच प्राण्याजवळ जाऊ नये. पाळीव कुत्रा असेल तर, कुत्र्याला त्याच्या कलाने जवळ येऊ देणंच चांगलं आणि आवश्यक असल्यास, सुरक्षितपणे आणि आदराने कसे संवाद साधायचा याबद्दल मार्गदर्शनासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण देणाऱ्या व्यावसायिकांचा सल्ला घ्या.