Road Quality Dispute: रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून तरुणाने विचारला जाब; भाजप मंत्र्याने लगावली कानशिलात, पहा व्हायरल व्हिडीओ

पश्चिम दिल्लीतील तिलक नगर परिसरात सुरू असलेल्या रस्ता निर्मितीच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय गेले असताना हा प्रकार घडला.
Parvesh Sahib Singh Verma slap video
भाजप मंत्र्याने रस्त्याच्या कामावरून जाब विचारणाऱ्या तरुणावर उचलला हात

Road Quality Dispute: दिल्लीतून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिल्ली सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मंत्री प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी रस्त्याच्या निकृष्ट कामावरून जाब विचारणाऱ्या एका तरुणावर हात उचलला. पश्चिम दिल्लीतील तिलक नगर परिसरात सुरू असलेल्या रस्ता निर्मितीच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय गेले असताना हा प्रकार घडला. यावेळी रस्त्याच्या दर्जाबाबत आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक आमदार जरनैल सिंह यांनी थेट प्रश्न उपस्थित केले. आमदार जरनैल सिंह यांनी रस्त्याचा काही भाग स्वतःच्या हाताने उखडून दाखवत थेट कामाच्या दर्जावरच बोट ठेवले, ज्यावरून मंत्री आणि आमदारांच्या समर्थकांमध्ये तुफान बाचाबाची झाली.

हेही वाचा – CJP Protest: निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात CJP आक्रमक; ‘या’ तारखेला शिवाजी पार्कात आंदोलनाची घोषणा

मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरुणावर मंत्र्यांचा थेट हल्ला

या संपूर्ण राजकीय वादाचे आणि निकृष्ट कामाचे एक तरुण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करत होता. व्हायरल होत असलेल्या चित्रफितीत मंत्री प्रवेश वर्मा यांनी आधी संबंधित तरुणाचा मोबाईल जबरदस्तीने खाली केला आणि त्यानंतर त्याच्या तोंडावर थेट मारल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे. ही घटना घडताच घटनास्थळी असलेल्या मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या तरुणासह तेथे जमा झालेल्या नागरिकांना तातडीने बाजूला ढकलून दिले. पीडित तरुणाने आपण आमदार जरनैल सिंह यांच्या सोशल मीडियाचे काम पाहत असल्याचे सांगितले असून, प्रशासकीय पाहणीदरम्यान वास्तव समोर आणत असताना आपल्यावर ही प्राणघातक वेळ आल्याचा आरोप केला आहे.

आम आदमी पक्ष आक्रमक

या संपूर्ण घटनेनंतर आम आदमी पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेत मंत्री प्रवेश वर्मा यांच्याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मंत्री वर्मा यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यासोबतच ते स्वतः तिलक नगर येथील त्या रस्त्याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे, आपचे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी ही चित्रफित प्रसारित करत भाजप मंत्र्यांच्या दादागिरीवर कडाडून हल्लाबोल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version