Bagram Base: भारत आणि अफगाणिस्थानचे संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. दरम्यान, आता अफगाणिस्तानने स्पष्ट केले आहे की ते बग्राम तळावर कोणत्याही परदेशी लष्करी उपस्थितीला परवानगी देणार नाहीत. याबाबत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुत्ताकी यांनी म्हटले, 'आम्ही कधीही परदेशी सैन्य स्वीकारले नाही आणि भविष्यताही स्वीकारणार नाही. अफगाणिस्तान हा सार्वभौम देश आहे आणि तसाच राहील. जर परदेशी राष्ट्रांना आमच्याशी संबंध हवेत, तर ते राजनैतिक मार्गाने साधू शकतात. परंतु लष्करी हस्तक्षेप आम्ही मान्य करू शकत नाही.'
सुरक्षेच्या चिंतांबाबत बोलताना मुत्ताकी म्हणाले की, गेल्या चार वर्षांत इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानने सिद्ध केले आहे की देशाचा भूभाग इतरांवर वापरला जाणार नाही. तथापी, त्यांनी परदेशी देशांच्या लष्करी पायाभूत सुविधा तैनात करण्याच्या प्रयत्नांना अस्वीकार्य ठरवले आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी त्यांचा विरोध दर्शविला. भारतासोबतच्या द्विपक्षीय बैठकीत मुत्ताकी यांनी भारताला अफगाणिस्तानच्या विकास आणि प्रगतीमध्ये रस असल्याचे अधोरेखित केले.
हेही वाचा - India to Open Embassy in Kabul : तालिबानबाबत नवी दिल्लीचा मोठा निर्णय! भारत काबूलमध्ये उघडणार दूतावास केंद्र
दरम्यान, शुक्रवारी भारताने अफगाणिस्तानला पाच रुग्णवाहिका सुपूर्द केल्या. तसेच, भारताने काबूलमधील आपले मिशन अपग्रेड करण्याचे वचन दिले आहे. मुत्ताकी यांची भारत भेट ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर पहिली उच्चस्तरीय भेट आहे. मुत्ताकी यांनी सांगितले की अफगाणिस्तान सर्व देशांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहे. तसेच देशाची भूमिका परदेशी हस्तक्षेपाविरुद्ध ठाम राहणार आहे.
हेही वाचा - Donald Trump : टॅरिफ, H-1B व्हिसानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का; थेट लाखो भारतीयांवर संकट
तथापी, मुत्ताकी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे स्वागत आणि भारत सरकारने दर्शविलेल्या आदरातिथ्याचे कौतुक केले. अफगाणिस्तानच्या या स्पष्ट धोरणामुळे परराष्ट्र संबंध, प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षा धोरणांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. तसेच यामुळे भारत-अफगाणिस्तान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याची संधी निर्माण झाली आहे.