AI Layoffs: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढत्या प्रभावामुळे आयटी क्षेत्रात अस्थिरतेची लाट उसळली आहे. जगातील मोठ्या टेक कंपन्या मेटा, गुगल, अमेझॉन, टीसीएस आणि अॅक्सेंचर यांनी गेल्या काही महिन्यांत एआय प्रकल्पांशी संबंधित हजारो नोकऱ्या कमी केल्या आहेत. एआयच्या नव्या युगात प्रवेश करण्याच्या स्पर्धेत, या कंपन्या एकीकडे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्यावर नोकर कपातीचे संकट उभे राहिले आहे.
मेटामध्ये मोठी कपात -
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, ज्यांनी यावर्षी ओपनएआय, अॅपल आणि गुगलसारख्या कंपन्यांतून तज्ज्ञांना आपल्या टीममध्ये घेतले होते, त्यांनाच आता कामावरून कमी करावे लागत आहे. मेटाचे मुख्य एआय अधिकारी अलेक्झांडर वांग यांनी कंपनीच्या Meta Superintelligence Labs (MSL) मधून सुमारे 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते, या कर्मचाऱ्यांना मेटामधील इतर विभागांमध्ये अर्ज करण्याची संधी दिली जाईल. याआधी, Wall Street Journal च्या अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यातच मेटाने त्यांच्या एआय विभागातील भरती पूर्णपणे थांबवली होती.
हेही वाचा - RRB NTPC Bharti 2025: स्टेशन मास्टर ते टीसीपर्यंत! भारतीय रेल्वेत 8800+ पदांसाठी मेगाभरती
गुगल आणि अमेझॉनमध्येही ‘नोकर कपात मोहीम’ सुरू
गुगलने सप्टेंबरमध्ये Gemini आणि AI Overviews प्रकल्पांमधून 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, तर ऑक्टोबरमध्ये त्यांच्या डिझाइन विभागातील 100 पदे रद्द केली. अमेझॉननेही मोठा निर्णय घेतला असून, सुमारे 15 टक्के कर्मचारीसंख्या कमी करण्याची तयारी सुरु आहे. सीईओ अँडी जेसी यांनी सांगितले की कंपनी आता 'AI-चालित भविष्याकडे वाटचाल करत आहे. बदलाशी जुळवून न घेणारे मागे राहतील.'
हेही वाचा - SEBI Mutual Fund Reforms: सेबीचा मोठा निर्णय ; गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठे बदल
टीसीएस आणि अॅक्सेंचरचा ‘डबल इम्पॅक्ट’
भारतीय आयटी दिग्गज टीसीएसनेही सुमारे 6 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, तसेच पुढील काही महिन्यांत आणखी तितक्याच कपातीची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, कंपनी यूकेमध्ये 5 हजार नव्या एआय नोकऱ्या निर्माण करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, अॅक्सेंचरने जागतिक स्तरावर 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे.
एआय क्रांती की नोकर कपातीचं संकट?
टेक कंपन्या दावा करतात की या कपाती AI परिवर्तनाच्या प्रवासाचा एक भाग आहेत. मात्र, उद्योगतज्ज्ञांच्या मते, हे Automation-induced Layoff Crisis चे स्पष्ट उदाहरण आहे. एआयच्या नावाखाली मशीन लर्निंग आणि ऑटोमेशनला गती मिळत असताना, मानवी कामगारांच्या भूमिकांवर संकटाचे सावट गडद होत चालले आहे.