US Devil's Snare on Venezuela's Oil Reserves : जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा असूनही अत्यंत गरिबी आणि महागाईच्या विळख्यात अडकलेल्या व्हेनेझुएलावर आता अमेरिकेने आपला प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने या देशातील मानवी हक्क किंवा लोकशाहीपेक्षा तेथील 'ब्लॅक गोल्ड' म्हणजेच कच्च्या तेलाला अधिक महत्त्व दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिती इतकी बिकट आहे की, 2025 मध्ये तेथील महागाईचा दर 500% नोंदवला गेला आहे, तर 2018 मध्ये हाच दर तब्बल 63,000% पर्यंत पोहोचला होता. अशा अस्थिरतेचा फायदा घेत अमेरिका आता या नैसर्गिक संपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा तीनपट मोठे घबाड
व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली दडलेल्या खजिन्याचा आकडा कोणाचेही डोळे दिपवणारा आहे. आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, या देशाकडे सुमारे 303 अब्ज बॅरल कच्चे तेल उपलब्ध आहे. जर या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलर इतकी गृहीत धरली, तर या एकूण साठ्याचे मूल्य अंदाजे 12.12 ट्रिलियन डॉलर इतके होते. हा आकडा भारताच्या सध्याच्या एकूण जीडीपीपेक्षा (GDP) तिप्पट मोठा आहे. एवढी प्रचंड संपत्ती हाती लागल्यास केवळ अमेरिकेची ऊर्जा सुरक्षाच मजबूत होणार नाही, तर रशिया आणि ओपेक (OPEC) देशांविरुद्ध अमेरिकेला एक अजेय 'ऊर्जा शस्त्र' मिळणार आहे. यामुळे व्हेनेझुएलाचे तेलसाठे घशात घालण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली आहे.
जपान आणि पाकिस्तानच्या तुलनेत अफाट संपत्ती
व्हेनेझुएलाच्या या तेलाचे गणित मांडल्यास धक्कादायक आकडेवारी समोर येते. सध्याच्या बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत म्हणजे प्रति बॅरल 30 डॉलरने जरी हिशोब केला, तरी या तेलाची एकूण किंमत सुमारे 9.1 ट्रिलियन डॉलर भरते. ही रक्कम जपानच्या अर्थव्यवस्थेच्या दुपटीपेक्षा जास्त असून शेजारील पाकिस्तानच्या जीडीपीच्या तुलनेत तर ती 30 पटीने अधिक आहे. हेच कारण आहे की, जपान किंवा भारतासारखे मोठे देशही या नैसर्गिक संपत्तीच्या मूल्यासमोर थिटे पडत आहेत आणि अमेरिका कोणत्याही परिस्थितीत या खजिन्यावर ताबा मिळवण्यासाठी आक्रमक झाला आहे.
हेही वाचा – Donald Trump: ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आकड्यांसह दिली माहिती, म्हणाले टॅरिफमधून कमावले..
राजकीय अस्थिरता आणि अमेरिकन कंपन्यांचा फायदा
गेल्या दोन दशकांपासून व्हेनेझुएला राजकीय आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जेव्हा एखादा देश आर्थिकदृष्ट्या कोसळतो, तेव्हा तेथे राजकीय अस्थिरता निर्माण होणे स्वाभाविक असते. निकोलस मादुरो यांचे सरकार अमेरिकेसाठी मोठा अडथळा ठरत होते, त्यामुळेच निर्बंध आणि राजवट बदलण्याच्या मोहिमेद्वारे तेथील तेल साठे अमेरिकन कंपन्यांसाठी खुले करण्याचा ट्रम्प यांचा मुख्य हेतू आहे. ट्रम्प यांच्या मते व्हेनेझुएलाचे तेल 'चुकीच्या व्यक्तींचा हातात' असून, त्यावर अमेरिकन हितसंबंधांचे नियंत्रण असणे जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःला हवे तसे तत्वज्ञान मांडत अमेरिका व्हेनेझुएलाच्या छाताडावर पाय देण्यास सज्ज झाला आहे.
जागतिक बाजारपेठेवर डॉलरचे वर्चस्व वाढणार
अमेरिकेच्या या कारवाईचा परिणाम केवळ व्हेनेझुएलापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जगावर होणार आहे. व्हेनेझुएलाचे स्वस्त तेल अमेरिकेच्या ताब्यात आल्यास जागतिक बाजारातील तेलाच्या किमती नियंत्रित करणे व्हाईट हाऊसला सोपे जाईल. यामुळे डॉलरची ताकद अधिक मजबूत होईल आणि रशियासारख्या तेल उत्पादक देशांच्या मक्तेदारीला लगाम बसेल. जरी व्हेनेझुएलाचे तेल जड आणि चिकट असले, तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यावर प्रक्रिया करून अमेरिका स्वतःला जगातील सर्वात मोठी 'ऊर्जा महासत्ता' म्हणून प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.